पवार-ठाकरे बैठकीत छापेमारीविरोधात डावपेचाची रणनीती!!!

0
255
जामखेड न्युज – – – 
 दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलेली घणाघाती टीका आणि त्यावर भाजपच्या नेत्यांनी केलेला गदारोळ पाहता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची पाठराखण करताना भाजपच्या नेत्यांनाही प्रत्युत्तर दिले. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या मागे लागलेले विविध तपास यंत्रणेचे शुक्लकाष्ट पाहता पवार आणि ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत या यंत्रणाविरुद्ध कसे लढायचे, याचे डावपेच आखले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भाजपच्या निशाण्यावर शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस
राज्यात तीन पक्षांचे सरकार असले, तरी कॉंग्रेसचे आव्हान आहे, असे भाजपला वाटत नाही. त्यामुळे भाजपने केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांना जायबंदी करायचे ठरविले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाइकांवर टाकलेल्या धाडीनंतर थेट मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर थेट आरोप सुरू झाल्याने पवार आणि ठाकरे यांना एकत्र येऊन भाजपच्या या आव्हानांचा कसा सामना करायचा, याचा खल करण्याची वेळ आली आहे. पश्‍चिम बंगालमध्ये भाजपने ममता बॅनर्जी यांना प्रचंड त्रास दिला; परंतु ज्या तडफेने त्या उभ्या राहिल्या, त्याच तडफेने महाराष्ट्राने भाजपचा प्रतिकार करण्याबाबत या दोन नेत्यांत चर्चा झाली असावी, असा तर्क आहे.
केंद्राच्या हस्तक्षेपाचा मुकाबला करण्याची व्यूहनीती
राज्यातील वाढत्या हस्तक्षेपाचा निकराने मुकाबला करायला हवा, असे मत शरद पवारांनी या वेळी मांडल्याचे समजते. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणांचा हस्तक्षेप वाढल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सीबीआय, आयटी, इडीमार्फत छापे टाकले जात आहेत, तर कॉंग्रेसच्या नेत्याशी संबंधित व्यक्तींवरही छापे टाकले जात आहेत. पवार यांनी यासाठी भाजपला जबाबदार धरत त्यांच्यावर नुकताच हल्ला चढवला होता.
छापेमारीला उत्तराची रणनीती
केंद्र सरकार राज्य सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असून, त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणाकडून त्रास दिला जात असल्याचा आरोपही पवार यांनी केला होता. केंद्राने राज्यातील सरकार पाडण्यासाठी कितीही प्रयत्न केले, तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तपास यंत्रणांच्या छापेमारीवर कठोर शब्दांत टीका केली होती. या पार्श्‍वभूमीवर दोघांतील बैठकीत छापेमारीला कसा शह द्यायचा, याची रणीनीती ठरली असण्याची शक्यता आहे.
महापालिकेसाठीही व्यूहरचना
या सर्व पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली. केंद्र सरकार असो वा त्यांच्या अख्यत्यारीतील तपास यंत्रणा; या दोन्हींचा महाविकास आघाडी सरकार म्हणून निग्रहाने मुकाबला करायला हवा, असा सल्ला पवार यांनी या वेळी ठाकरे यांना दिल्याचे कळते. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यातही प्रामुख्याने मुंबई महापालिका निवडणुकीच्या मुद्द्यांवरही या वेळी चर्चा झाल्याचे समजते.
ठाकरे यांचे कौतुक
दसरा मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे यांनी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तसेच भाजपवर कडाकडून टीका केली होती. त्याचाही उल्लेख करीत पवार यांनी ठाकरे यांचे कौतुक केल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here