जामखेड प्रतिनिधी
देशाला स्वातंत्र्य मिळून 74 वर्षे झाले तरीही शासनाच्या विविध योजना वाडी वस्तीवरील वंचित घटकांपर्यंत अद्यापही पोहचलेल्या नाहीत. आज ग्रामीण भागातील महिलांना उघड्यावर शौचास जावे लागते. कोट्यावधी रुपयांच्या पाणी योजना राबवूनही महिलांच्या डोक्यावरील हंडा मुक्त झाला नाही पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. गटारे उघड्यावर आहेत. स्वच्छतेचा आभाव आहे. या सर्व मागासलेपणास स्थानिक ग्रामपंचायतचा कारभार जबाबदार आहे. घरोघरी शौचालय व हंडामुक्ती साठी तसेच वंचित घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचवण्यासाठी मी उमेदवारी करत आहे. तरी श्री साकेश्वर परिवर्तन पॅनलला बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन उमेदवार गोजर नेमाने केले.
श्री साकेश्वर परिवर्तन पॅनलच्या प्रचारासाठी पिंपळवाडी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उमेदवार गोजर नेमाने बोलत होत्या यावेळी पॅनल प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय वराट व पॅनलचे मार्गदर्शक सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट, माजी सरपंच कांतीलाल वराट, कैलास वराट, अविन लहाने, दादासाहेब लहाने, माजी ग्रामपंचायत सदस्य आश्रू नेमाने, माजी व्हाईस चेअरमन नवनाथ घोलप, प्रकाश घोलप, विशाल नेमाने, अजय नेमाने, उमेश नेमाने, आकाश मोहिते, बंडू मोहिते, कृष्णा पुलवळे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना गोजर नेमाने म्हणाल्या की, शासनाच्या विविध योजना असतात. त्या योग्य पद्धतीने राबविल्या व वंचित घटकांपर्यंत पोहचल्या तर समस्या राहत नाहीत. ह्या करून घेण्यासाठी योग्य सदस्य निवडणे गरजेचे असते. मला जर संधी मिळाली तर मी ग्रामपंचायत मध्ये प्राधान्याने वाडीतील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवून महीलांना हंडा मुक्त केले जाईल, वाडीत स्वच्छता, बंदिस्त गटारे, वाचनालय व व्यायामशाळा करण्यासाठी प्रयत्न करील वाडीचा सर्वागीण विकास करण्यासाठी श्री साकेश्वर परिवर्तन पॅनलला बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन गोजर नेमाने यांनी दिले. यावेळी वाडीतील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. वाडीतील एक महिला एवढ्या निर्धाराने प्रथमच बोलताना वाडीतील लोकांनी पाहिले वाडीच्या विकासासाठी अशीच शिक्षित उमेदवार निवडले पाहिजेत अशी चर्चा वाडीतील लोकांमधे होती.