जामखेड न्युज – – – – –
ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण अन् ‘बाप्पा मोरया’चा जयघोष!
जामखेडमध्ये शितल कलेक्शनच्या बाप्पाला वाजत-गाजत भावपूर्ण निरोप

जामखेड शहरात अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन मिरवणुकांना मोठा उत्साह आणि भक्तिमय वातावरण लाभले. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण, गणरायाच्या जयघोषाने दुमदुमलेले रस्ते आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले गणेशभक्त अशा उत्साहपूर्ण वातावरणात शहरातील प्रसिद्ध ‘शितल कलेक्शन’च्या गणरायाला वाजत-गाजत भावपूर्ण निरोप देण्यात आला.

शितल कलेक्शन गणेश मंडळाच्या वतीने आंदुरे परिवार आणि त्यांच्या मित्रपरिवाराने गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशांचा निनाद आणि गुलालाची उधळण यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय तसेच उत्साहाने भारावून गेले होते. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषाने मिरवणुकीचा परिसर दुमदुमून गेला.

मिरवणुकीत कार्यकर्ते, नागरिक आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून बाप्पाच्या मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ढोल-ताशांच्या तालावर तरुणाईचा उत्साह पाहायला मिळत होता, तर दुसरीकडे गणरायाच्या दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

मिरवणुकीच्या उत्तरार्धात गणेशभक्तांच्या उत्साहाला भक्तिभावाची किनार लाभली. लाडक्या गणरायाची आरती करण्यात आली. त्यानंतर विधिवत उत्तरपूजा संपन्न करून अत्यंत भक्तिभावाने गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. वर्षभराचा सहवास संपवत बाप्पाला निरोप देताना आंदुरे परिवारासह उपस्थित भाविक भावूक झाले.




