जामखेड न्युज – – – – –
जामखेडच्या पाणी व रस्ता प्रश्नावर भाजपाच्याच ज्येष्ठ नेत्यांचा एल्गार!
प्रा. मधुकर राळेभात यांचा सत्ताधारी भाजपाला घरचा आहेर, १५ ते २० दिवस पाण्याविना नागरिक, रखडलेल्या कामांवर प्रशासनाला धारेवर धरले!
शहरातील तीव्र पाणीटंचाई, उजनी पाणीपुरवठा योजनेचे रखडलेले काम, रस्त्यांची दुरवस्था आणि कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पातील जामखेडच्या पाणीहक्काचा प्रश्न यावर भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी आज (दि. १४) पत्रकार परिषद घेऊन परखड भूमिका मांडली. विशेष म्हणजे, सत्ताधारी भाजपामधीलच ज्येष्ठ नेत्याने जामखेडच्या प्रश्नांवर उघडपणे नाराजी व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात या पत्रकार परिषदेची चर्चा सुरू झाली आहे.
१४ ते २० दिवसांनी पाणी; नागरिकांचे हाल!
जामखेड शहरात सध्या पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. काही भागांत १४ ते १५ दिवसांनी, तर काही ठिकाणी तब्बल २० दिवसांनंतर पाणी मिळत आहे. प्रत्येक नागरिकाला पाणी विकत घेण्याची वेळ आली असून अनेकांना पैसे देऊनही पुरेसे पाणी मिळत नसल्याचे राळेभात यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी तहसील कार्यालयात येऊन गेले, मात्र भुतवडा तलावात पाणी असल्याचा चुकीचा अहवाल प्रांताधिकाऱ्यांनी दिल्यामुळे शहरासाठी टँकर मंजूर होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून लोकसंख्येच्या प्रमाणात जास्तीत जास्त टँकर तातडीने सुरू करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

जामखेडला ६ टीएमसी पाणी कधी मिळणार?
कुकडीचे पाणी आणि कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचे पाणी जामखेड तालुक्याला मिळावे, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. नियमानुसार जामखेड तालुक्याला कृष्णा खोऱ्यातून ६ टीएमसी पाणी मिळाले पाहिजे, असे राळेभात यांनी स्पष्ट केले.






