Saturday, September 26, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडच्या लेकीची नेत्रदीपक भरारी! डॉ. मिसबाह शेख जिल्ह्यातील पहिल्या ग्लुकोमा सर्जन ...

जामखेडच्या लेकीची नेत्रदीपक भरारी! डॉ. मिसबाह शेख जिल्ह्यातील पहिल्या ग्लुकोमा सर्जन जिद्द, चिकाटी अन् मेहनतीच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रात मानाचा शिरपेच, न्यायाधीश सत्यवान डोके यांच्या हस्ते सत्कार

0
2
जामखेडच्या लेकीची नेत्रदीपक भरारी! डॉ. मिसबाह शेख जिल्ह्यातील पहिल्या ग्लुकोमा सर्जन  जिद्द, चिकाटी अन् मेहनतीच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रात मानाचा शिरपेच, न्यायाधीश सत्यवान डोके यांच्या हस्ते सत्कार

जामखेड न्युज – – – – – 

जामखेडच्या लेकीची नेत्रदीपक भरारी! डॉ. मिसबाह शेख जिल्ह्यातील पहिल्या ग्लुकोमा सर्जन

जिद्द, चिकाटी अन् मेहनतीच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रात मानाचा शिरपेच, न्यायाधीश सत्यवान डोके यांच्या हस्ते सत्कार

 

जिद्द, चिकाटी, मेहनत आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर जामखेडच्या कन्या डॉ. मिसबाह शेख यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले असून, जिल्ह्यातील पहिल्या ग्लुकोमा सर्जन म्हणून त्यांनी मानाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जामखेडकरांकडून कौतुक होत असून, जिल्हा व सत्र न्यायाधीश सत्यवान डोके यांनी डॉ. मिसबाह शेख यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला.

यावेळी बोलताना न्यायाधीश सत्यवान डोके म्हणाले की, “जामखेडचे भूषण ठरलेल्या डॉ. रजनीकांत आरोळे आणि कवी-वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या नंतर डॉ. मिसबाह शेख यांनीही आपल्या जिद्द, चिकाटी, मेहनत आणि हुशारीच्या जोरावर मोठे यश मिळविले आहे. जिल्ह्यात पहिल्यांदा ग्लुकोमा सर्जन म्हणून त्यांनी मिळविलेले विशेष प्राविण्य ही जामखेडकरांसाठी अभिमानाची बाब आहे.”

डॉ. मिसबाह शेख यांच्या घरी झालेल्या या सत्कारप्रसंगी माजी प्राचार्य श्रीकांत होशिंग, जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण, ल. ना. होशिंग विद्यालयाचे उपमुख्याध्यापक अनिल देडे, पर्यवेक्षक सुदाम वराट तसेच डॉ. फारूक आझम, बिल्कीस शेख उपस्थित होते.

न्यायाधीश डोके पुढे म्हणाले की, डॉ. मिसबाह यांनी जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. परिसरातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचा शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवास प्रेरणादायी असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी त्यांचे उदाहरण निश्चितच आदर्श ठरणारे आहे.

दहावीला तब्बल ९८.४५ टक्के गुण; तालुक्यात प्रथम
डॉ. मिसबाह शेख या शालेय जीवनापासूनच अत्यंत हुशार आणि अभ्यासू विद्यार्थीनी म्हणून परिचित होत्या. जामखेड येथील ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून त्यांनी सन २०१२ मध्ये दहावीची बोर्ड परीक्षा दिली. या परीक्षेत त्यांनी तब्बल ९८.४५ टक्के गुण मिळवत जामखेड तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच पुणे बोर्डाच्या पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी स्थान मिळविले.

बारावीच्या परीक्षेतही त्यांनी ८९ टक्के गुण मिळवून आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखविली. त्यांच्या या शैक्षणिक गुणवत्तेमुळे त्यांना इन्स्पायर अवॉर्ड शिष्यवृत्ती मिळाली.

वडिलांकडून मिळाली वैद्यकीय क्षेत्राची प्रेरणा
डॉ. मिसबाह शेख यांचे वडील डॉक्टर असल्याने लहानपणापासूनच त्यांच्या मनात वैद्यकीय क्षेत्राविषयी आवड निर्माण झाली. वैद्यकीय क्षेत्रातच करिअर करण्याचा निर्धार करून त्यांनी नीट परीक्षेची तयारी केली. त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर शासकीय कोट्यातून पुणे येथील काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएससाठी प्रवेश मिळविला. साडेपाच वर्षांच्या अभ्यासक्रमानंतर त्यांनी एमबीबीएस पदवी संपादन केली.
यानंतर त्यांनी लातूर येथून एम.एस. (नेत्ररोग) हे पदव्युत्तर शिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण केले. नेत्ररोग क्षेत्रात अधिक प्रावीण्य मिळविण्याच्या उद्देशाने त्यांनी पुढील शिक्षणासाठी देशातील अग्रगण्य संस्थांपैकी एक असलेल्या कोईम्बतूर, तामिळनाडू येथे प्रवेश घेतला.
तेथे त्यांनी ग्लुकोमा या विषयातील दोन वर्षांची सुपर स्पेशलायझेशन फेलोशिप यशस्वीरीत्या पूर्ण केली. या विशेष प्रशिक्षणामुळे त्या ग्लुकोमा सर्जरीच्या क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त करणाऱ्या जिल्ह्यातील पहिल्या डॉक्टर ठरल्या आहेत.

जामखेडच्या शैक्षणिक परंपरेचा अभिमान
ग्रामीण भागातून शिक्षण घेत अत्यंत उच्च पातळीवरील वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉ. मिसबाह शेख यांनी मिळविलेले हे यश जामखेडच्या शैक्षणिक परंपरेला अभिमान मिळवून देणारे आहे. विशेषतः ल. ना. होशिंग विद्यालयातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनीने वैद्यकीय क्षेत्रातील सुपर स्पेशलायझेशनपर्यंत मजल मारणे ही विद्यालयासाठी तसेच जामखेडकरांसाठी गौरवास्पद बाब मानली जात आहे.

डॉ. मिसबाह शेख यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने मेहनत करण्याची प्रेरणा निर्माण होणार आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जामखेडकरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!