गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने जामखेड दणाणले! नगरपरिषदेच्या स्वागत सोहळ्याला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद गणेशोत्सव हा सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचा सण – अमित चिंतामणी
गणेशोत्सव हा सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचा सण – अमित चिंतामणी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जामखेड शहरात उत्साहाला उधाण आले असून, जामखेड नगरपरिषदेच्या वतीने शहरात येणाऱ्या गणेशभक्तांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. नगराध्यक्षा सौ. प्रांजलताई अमितभाऊ चिंतामणी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या स्वागत सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी, भाजपाचे नेते अमित चिंतामणी, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भगवानराव मुरूमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले, उपनगराध्यक्ष पोपट नाना राळेभात, सभापती श्रीराम डोके, ॲड. प्रविण सानप, मोहन पवार, पवन राळेभात, नगरसेवक विकी घायतडक, अशोक शेळके, प्रविण चोरडिया, प्रविण होळकर, कांतीलाल वराट, राहुल बेथमुथ्था यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरपरिषदेच्या वतीने गणेशभक्तांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भगवे फेटे व उपरण्यांनी सजलेले कार्यकर्ते, गणेशभक्तांची मोठी उपस्थिती, आकर्षक स्वागत फलक आणि मान्यवरांचा सहभाग यामुळे कार्यक्रमस्थळी भक्तिमय व उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. गणरायाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
‘गणेशोत्सव हा सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचा सण’ यावेळी बोलताना भाजपा नेते अमित चिंतामणी यांनी गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरा जपणारा उत्सव असल्याचे सांगितले. नागरिकांनी गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत आणि उत्साहात साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवावेत. रक्तदान, स्वच्छता अभियान, पर्यावरण संवर्धन तसेच गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
स्वागत सोहळ्यासाठी उभारण्यात आलेल्या आकर्षक फलकामुळे परिसराला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले होते. पारंपरिक संस्कृती आणि सामाजिक सलोखा यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला. दरम्यान, जामखेड शहरातील विविध गणेश मंडळांकडून गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नगरपरिषदेच्या या स्वागत सोहळ्यामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहात आणखी भर पडली असून, शहरातील गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गणरायाच्या जयघोषात नागरिकांनी या स्वागत सोहळ्याचा उत्स्फूर्त आनंद घेतला.