तडजोडीनंतर २.१५ लाखांवर सौदा, एक लाखांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात!
पाथर्डी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अंमलदार विनोद शिवाजी मासाळकर (वय ३७, ब. नं. २४६७) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे पाथर्डी पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे.
एसीबीकडे प्राप्त तक्रारीनुसार, तक्रारदार यांच्या हॉटेलवर काम करणाऱ्या एका नोकराचा पाथर्डी शहरातून मोटारसायकलवरून जात असताना एका अनोळखी ट्रकचालकाशी वाहनाला कट लागल्याच्या कारणावरून वाद झाला. त्यानंतर दोघांमध्ये मारामारी झाली होती.
या प्रकरणात संबंधित नोकरावर खुनाचा प्रयत्न व रॉबरीसारखा गंभीर गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याचा तक्रारीत उल्लेख आहे. त्यानंतर तक्रारदार पाथर्डी पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार विनोद मासाळकर यांना भेटले. त्यावेळी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल न करता सौम्य स्वरूपाचा मारामारीचा गुन्हा दाखल करण्यासाठी तसेच आरोपीला लवकर जामीन मिळवून देण्यासाठी व तपासात मदत करण्याच्या मोबदल्यात ५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १८ सप्टेंबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर १९ सप्टेंबर रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी पंचांसमक्ष तडजोडीनंतर २ लाख १५ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे ठरल्याचे एसीबीच्या अहवालात नमूद आहे.
त्यानुसार १९ सप्टेंबर रोजी रचलेल्या सापळ्यात तक्रारदाराकडे उपलब्ध असलेली १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस अंमलदार विनोद मासाळकर यांना एसीबी पथकाने ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान आरोपीच्या अंगझडतीत Vivo V50 मोबाईल, १५ हजार १३० रुपये रोख आणि एटीएम कार्ड मिळून आल्याची माहिती एसीबीने दिली आहे. आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.
या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाणे, जि. अहिल्यानगर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या कारवाईचे नेतृत्व संतोष पैलकर, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांनी केले. कारवाई पथकात पोहवा दिनेश खैरनार, पोहवा अविनाश पवार आणि पोशि योगेश शिंदे यांचा समावेश होता. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक श्रीमती सविता तांबे करीत आहेत. कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता फडतरे यांचे मार्गदर्शन लाभले. नागरिकांना एसीबीचे आवाहन कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने शासकीय काम करून देण्यासाठी अथवा न करण्यासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.