३१ वर्षांची भक्तीची अखंड वारी! जामखेड ते पंढरपूर बाफना परिवाराची कार्तिकी पायी दिंडी १४ नोव्हेंबरपासून!
जामखेडकरांच्या श्रद्धा, भक्ती आणि वारकरी परंपरेचा वारसा जपणारा जामखेड ते श्रीक्षेत्र पंढरपूर ३१ वा वार्षिक कार्तिकी पायी दिंडी सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, दि. १४ नोव्हेंबर २०२६ पासून या भक्तिमय सोहळ्याला प्रारंभ होणार असून रविवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथे दिंडीची सांगता होणार आहे.
श्री विठ्ठल भजनी मंडळ, जामखेड व समस्त ग्रामस्थ जामखेड यांच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. श्री. दिलीपजी चांदमलजी बाफना, श्री. आकाश दिलीपजी बाफना व परिवार यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गेल्या ३९ वर्षांपासून सुरू असलेली ही अखंड भक्तीपरंपरा आजही मोठ्या श्रद्धेने पुढे सुरू आहे.
या दिंडीदरम्यान दररोज मुक्कामाच्या ठिकाणी भजन, कीर्तन, प्रवचन, आरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. वारकऱ्यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था विविध दानशूर व्यक्ती, ग्रामस्थ आणि भजनी मंडळांच्या सहकार्याने करण्यात आली आहे.
दिंडीचा मुक्काम व नियोजन १४ नोव्हेंबर : हनुमान मंदिर, बोर्ली १५ नोव्हेंबर : मार्केट यार्ड, करमाळा १६ नोव्हेंबर : सांस्कृतिक हॉल, बाजारतळ, जेऊर १७ नोव्हेंबर : श्रीराम मंदिर, दहिवली रोड, कंदर १८ नोव्हेंबर : प्राथमिक आरोग्य केंद्र, पारिते १९ नोव्हेंबर : बाळकृष्ण काटे, अंजनोत २० व २१ नोव्हेंबर : सोनेपठकर मठ, सोलापूर रोड, श्रीक्षेत्र पंढरपूर २२ नोव्हेंबर : सकाळी द्वादशीचे पारणे व परतीचा प्रवास. रविवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता द्वादशीचे पारणे सोडून सर्व वारकरी परतीच्या प्रवासाला निघणार आहेत.
या सोहळ्यात श्री विठ्ठल भजनी मंडळ, तपनेश्वर भजनी मंडळ, श्री नागेश्वर भजनी मंडळ, जमादारवाडी भजनी मंडळ, जांगडवाडी भजनी मंडळ यांच्यासह विविध भजनी मंडळांचा सहभाग राहणार आहे.
३१ वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा म्हणजे जामखेडच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक आहे. विठ्ठलनामाचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि हरिनामाच्या जयघोषात निघणाऱ्या या दिंडी सोहळ्यात जामखेड व परिसरातील जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक बाफना परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.