जामखेड न्युज – – – – –
ढोल-डीजेला फाटा! टाळ-मृदंगाच्या गजरात खर्डा पोलिसांची संस्कृती जपणारी गणेश मिरवणूक
‘परंपरा जपूया, ध्वनीप्रदूषण टाळूया’चा खर्डा पोलीसांकडून अनोखा संदेश

गणेशोत्सव म्हटले की उत्साह, भक्ती आणि जल्लोषाला उधाण येते. मात्र, उत्सवाचा आनंद साजरा करताना ध्वनीप्रदूषण टाळून पारंपरिक संस्कृतीचे जतन करण्याचा संदेश देत खर्डा पोलीस स्टेशनच्या पुढाकाराने टाळ-मृदंगाच्या गजरात सुसंस्कृत गणेश मिरवणूक काढण्यात आली. या अनोख्या उपक्रमाने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

मा. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उज्वल सिंह राजपूत यांच्या पुढाकाराने या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. टाळ, मृदंग, पखवाज, लेझीम, शंख आणि घंटानादाच्या तालावर भक्तिमय वातावरणात मिरवणूक पार पडली.

गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या आवाजातील ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्याबरोबरच आपल्या पारंपरिक वाद्यांची ओळख आणि महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, हा या उपक्रमामागील उद्देश होता. पारंपरिक वाद्यांच्या निनादात गणरायाचे स्वागत करत नागरिकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

‘परंपरा जपूया, संस्कृती जपूया आणि ध्वनीप्रदूषण टाळूया’ हा संदेश या मिरवणुकीतून देण्यात आला. उत्सव साजरा करताना सामाजिक सलोखा, शांतता आणि शिस्त कायम ठेवण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले.




