डेरवण, जिल्हा रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या ४० व्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी दमदार कामगिरी करत शाळेचे तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव राज्याच्या क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल केले आहे.
१६ वर्षांखालील मुलींच्या गोळाफेक या क्रीडा प्रकारात विद्यालयाची कु. पायल गवळी हिने तब्बल ११.५० मीटर गोळा फेकत रौप्यपदक पटकावले. चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत पायलने सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी करत आपल्या क्रीडानैपुण्याची छाप उमटवली.
पायलच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत तिची गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय वेस्ट झोन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे पायलच्या यशाला आता राष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याची संधी मिळाली असून, तिच्याकडून पुढील स्पर्धेतही दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, २० वर्षांखालील मुलींच्या थाळीफेक या क्रीडा प्रकारात विद्यालयाची कु. सिद्धी रासकर हिने ३४.६७ मीटर थाळी फेकून कांस्यपदक पटकावले. सिद्धीनेही आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर राज्यस्तरीय स्पर्धेत विद्यालयाचा नावलौकिक वाढवला.
या दोन्ही खेळाडूंच्या यशामुळे ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीला आणखी एक मानाचा तुरा लाभला आहे. त्यांच्या यशाबद्दल विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच क्रीडाप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पायल गवळी आणि सिद्धी रासकर यांच्या या यशामागे त्यांचे सातत्यपूर्ण सराव, मेहनत, जिद्द आणि मार्गदर्शकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. दोन्ही खेळाडूंनी भविष्यात आणखी मोठे यश मिळवत विद्यालय, जामखेड आणि अहिल्यानगर जिल्ह्याचा नावलौकिक उंचावावा, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
पायल गवळी व सिद्धी रासकर च्या यशाबद्दल तसेच क्रीडा शिक्षक राघवेंद्र धनलगडे, बापू जरे, प्रल्हाद साळुंके, धीरज पाटील यांचे दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, सचिव अरुणशेठ चिंतामणी, उपाध्यक्ष दिलीप गुगळे, सहसचिव डॉक्टर सुनील कटारिया, माजी सचिव शशिकांत देशमुख, माजी खजिनदार राजेश मोरे यांच्या सह सर्व संचालक मंडळ तसेच प्राचार्य, उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक तसेच शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी अभिनंदन केले आहे.