जामखेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावाने तळ गाठला
तलावातून राजरोस शेतीपंप सुरूच पिण्याचे पाणी राखीव ठेवण्याची मागणी
जामखेड शहर व तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असताना, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावातून शेतीसाठी राजरोसपणे पाण्याचा उपसा सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. एकीकडे शहरातील नागरिकांना सध्या दहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे, तर दुसरीकडे तलावातील शिल्लक पाणीसाठ्यातून कृषी पंप सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
भुतवडा तलावाची पाणीसाठवण क्षमता ११९ दशलक्ष घनफूट, तर जोडतलावाची क्षमता ४८.२५ दशलक्ष घनफूट असल्याचे सांगण्यात येते. मात्र यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने तलावातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. सध्या उपयुक्त पाणीसाठा अवघा सहा टक्के शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे.शहरासाठी पाणी कमी, मात्र शेतीपंप सुरूच!
जामखेड शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दहा-दहा दिवस प्रतीक्षा करावी लागत असताना भुतवडा तलाव परिसरात अनेक ठिकाणी शेतीपंप सुरू असल्याचे दिसून येत आहे. तलावातील अत्यल्प पाणीसाठा शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याची गरज असताना कृषी पंपांद्वारे पाण्याचा उपसा सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
तलावातून शेतीकडे घेऊन जाणारे पाणी आणि सुरू असलेल्या मोटारी तातडीने बंद करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती का करण्यात आलेली नाही? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. पाणीटंचाईचा फटका नागरिकांना, प्रशासन मात्र सुस्त?
शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, विहिरी आणि उपलब्ध स्रोतांवर अवलंबून राहण्याची वेळ येत असताना पिण्याच्या पाण्याच्या स्रोतावरच कृषी पंप सुरू राहणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याची गरज असताना तलावातील शिल्लक पाण्याचा शेतीसाठी उपसा सुरू राहिल्यास भविष्यात शहराच्या पाणीपुरवठ्याचे संकट आणखी गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे.
नगरपरिषद व लघुपाटबंधारे विभागाने तातडीने कारवाई करावी भुतवडा तलावातील सध्याचा पाणीसाठा लक्षात घेता शेतीसाठी सुरू असलेल्या मोटारींची तपासणी करून अनधिकृत पाणीउपसा तातडीने थांबवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच तलाव परिसरात नियमित गस्त घालण्यासाठी पथक नियुक्त करावे आणि शहराच्या पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एकीकडे सहा टक्के पाणीसाठा आणि दहा दिवसाआड पाणीपुरवठा, तर दुसरीकडे तलावात सुरू असलेल्या शेतीपंपांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष — जामखेडच्या पाणीप्रश्नावर आता प्रशासन ठोस पाऊल उचलणार का? असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.