Home क्राईम न्यूज जुन्या तक्रारीचा राग; मोटारसायकलचा पाठलाग करून तरुणावर कोयता फेकून जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न,...

जुन्या तक्रारीचा राग; मोटारसायकलचा पाठलाग करून तरुणावर कोयता फेकून जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न, तिघांविरुद्ध गुन्हा

0
4

जामखेड न्युज – – – – 

जुन्या तक्रारीचा राग; मोटारसायकलचा पाठलाग करून तरुणावर कोयता फेकून जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न, तिघांविरुद्ध गुन्हा

 

चुलत मामाच्या मुलीच्या छेडछाडीप्रकरणी पोलिसांत दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून एका तरुणावर कोयता फेकून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना जामखेड तालुक्यात घडली.

मोटारसायकलचा पाठलाग करून कट मारत रस्त्यावर पाडल्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका नामनिर्देशित आरोपीसह दोन अनोळखी इसमांविरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार
फिर्यादी हे  शनिवारी (१ ऑगस्ट) सकाळी पत्नीला माहेरी सोडण्यासाठी गेले होते. पत्नीला सोडल्यानंतर दुपारी सुमारे १२.४० वाजता ते एकटेच मोटारसायकलवरून करमाळा-जामखेड मार्गे जामखेडकडे निघाले.

दुपारी सुमारे १ वाजता करमाळा-जामखेड रस्त्यावरील एका बंद पडलेल्या हॉटेलसमोर मागून आलेल्या बजाज पल्सरवरील तिघांनी त्यांच्या मोटारसायकलचा पाठलाग केला. सुरुवातीला कट मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर आरोपींनी पुढे जाऊन फिर्यादी यांच्या दिशेने कोयता फेकल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यामुळे मोटारसायकलचा तोल जाऊन ते रस्त्याच्या कडेला पडले.

रस्त्यावर पडल्यानंतर पल्सरवरील तिघेही त्यांच्या जवळ आले. त्यामध्ये चुंभळी येथील निखील रुबन हुलगुंडे याला फिर्यादीने ओळखले, तर उर्वरित दोघे अनोळखी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली आणि “तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत घटनास्थळावरून पलायन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

फिर्यादीनुसार, काही दिवसांपूर्वी फिर्यादीच्या चुलत मामाच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी निखील हुलगुंडे याच्याविरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. याच तक्रारीचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटनेनंतर फिर्यादी यांनी मित्र संदीप शेंडगे याला घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी जामखेड पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी मेमो दिल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन त्यांनी अधिकृत फिर्याद दाखल केली.

या प्रकरणी जामखेड पोलिसांनी निखील रुबन हुलगुंडे (रा. चुंभळी) व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ४ व २५ तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८(१), ३५२, ३५१(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!