खुरपणीसाठी शेतात गेले, अन् चोरट्यांनी साधला डाव; खर्डा पोलिस ठाणे हद्दीत दिवसाढवळ्या घरफोडी
बंद घराचे कुलूप तोडून कपाट फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलिस ठाणे हद्दीत दिवसाढवळ्या घरफोडीची धक्कादायक घटना घडली आहे. सोयाबीन खुरपणीसाठी शेतात गेलेल्या शेतकरी दाम्पत्याच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील गोदरेज कपाट फोडून त्यामधील ५० हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकरी वर्गातही चिंतेचे वातावरण आहे.
याबाबत अभिमान अर्जुन बोराडे (वय ३५, रा. जवळके, ता. जामखेड) यांनी खर्डा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, १६ जुलै रोजी सकाळी सुमारे ११ वाजता ते व त्यांची पत्नी घराला कुलूप लावून सोयाबीन पिकाच्या खुरपणीसाठी शेतात गेले होते. दुपारी साडेदोनच्या सुमारास त्यांच्या भावजय समृद्धी वर्धमान बोराडे यांनी घराचे कुलूप तुटल्याची माहिती दिली.
त्यानंतर बोराडे दाम्पत्य तातडीने घरी पोहोचले. घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. घरात प्रवेश करून पाहणी केली असता गोदरेज कपाटाचे दार धारदार हत्याराच्या सहाय्याने फोडण्यात आल्याचे दिसून आले. कपाटातील लॉकरही उघडण्यात आला होता. त्यामधील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने गायब असल्याचे लक्षात येताच चोरी झाल्याची खात्री झाली.
चोरीस गेलेल्या ऐवजात ५० हजार रुपयांची रोख रक्कम, सुमारे १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण तसेच प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या यांचा समावेश असून, एकूण ऐवजाची किंमत २ लाख ५० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३०५(अ) व ३३१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.