जामखेड येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाचे २२ जुलै रोजी लोकार्पण; विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन आधुनिक शेती तंत्रज्ञान कार्यशाळेचेही आयोजन; शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – सभापती पै. शरद कार्ले यांचे आवाहन
जामखेड येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाचे २२ जुलै रोजी लोकार्पण; विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
आधुनिक शेती तंत्रज्ञान कार्यशाळेचेही आयोजन; शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – सभापती पै. शरद कार्ले यांचे आवाहन
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सुमारे ₹१ कोटी २७ लाख ८४ हजार १७ रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ या अत्याधुनिक इमारतीचा लोकार्पण सोहळा बुधवार, दि. २२ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित करण्यात आला आहे. या भवनाचे लोकार्पण महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या शुभहस्ते होणार असून, या कार्यक्रमासाठी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बाजार समितीने हे शेतकरी भवन उभारले असून, या माध्यमातून शेतकरी वर्गाला विविध उपक्रमांचा लाभ मिळणार आहे. या लोकार्पण सोहळ्याबरोबरच राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे आणि जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक लिंबू, कांदा, उडीद व सोयाबीन लागवड तसेच काढणीनंतरच्या व्यवस्थापनाविषयी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले आहे.
या लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पणन संचालक शरद जरे हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून सहकारी संस्था, अहिल्यानगरचे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, बाजार समितीचे उपसभापती नंदकुमार प्रकाश गोरे यांच्यासह बाजार समितीचे सर्व संचालक, सचिव दिलीप तिजोरे, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था जामखेड तसेच बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी गौतम उतेकर, विष्णू भोंडवे, सचिन घुमरे, नारायण जायभाय, सुधीर राळेभात, सतीश शिंदे, राहुल बेदमुथ्था, सुरेश पवार, अंकुश ढवळे, गणेश जगताप, वैजीनाथ पाटील, सिताराम ससाणे, रतन विठ्ठल चव्हाण, अनिता गजानन शिंदे, रविंद्र हुलगुंडे, कैलास वराट आदी संचालक उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत होणाऱ्या प्रशिक्षण कार्यशाळेत लिंबू, कांदा, उडीद व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक लागवड पद्धती, काढणीनंतरचे व्यवस्थापन, दर्जेदार उत्पादन, साठवणूक, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेतील संधी याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
शेतमालाला अधिक चांगला बाजारभाव मिळावा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे. या दोन्ही महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले यांनी केले आहे.