जामखेड न्युज – – – – –
चोरीचा माल खरेदी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी – मंगेश (दादा) आजबे
जामखेड तालुक्यात मोटार-केबल चोरीच्या वाढत्या घटनांनी शेतकरी संतप्त; तहसीलदार व पोलिसांना निवेदन

जामखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत मोटारी, वीज केबल, बॅटऱ्या तसेच इतर कृषी साहित्याच्या चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते मंगेश दादा आजबे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधवांनी तहसीलदार तसेच जामखेड पोलीस ठाण्यास निवेदन देत चोरीचा माल खरेदी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मंगेश दादा आजबे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, जामखेड तालुक्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून शेतकऱ्यांच्या वीज मोटारी, केबल, बॅटऱ्या आणि इतर कृषी साहित्याच्या चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या असूनही बहुतांश प्रकरणांमध्ये चोरीचा माल अद्याप संबंधित शेतकऱ्यांना परत मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

त्यांनी सांगितले की, पोलिसांनी अलीकडेच चोरीचा संशय असलेला तांब्याच्या तारा व स्टील केबलचा मोठा साठा जप्त केला आहे. मात्र, या प्रकरणाचा सखोल तपास करून जप्त करण्यात आलेल्या मालाची ओळख पटवून तो संबंधित शेतकऱ्यांना परत मिळवून देणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

“शेतकरी रक्ताचे पाणी करून शेती करतो. त्याच्या कष्टाची साधने चोरीला जाणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. चोरी करणाऱ्यांबरोबरच चोरीचा माल खरेदी करणाऱ्यांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे,” असे आजबे यांनी ठामपणे सांगितले.
तालुक्यातील सर्व स्टील व भंगार खरेदी-विक्री करणाऱ्या दुकानांची नियमित तपासणी करून चोरीचा माल खरेदी-विक्री होत नाही ना, याची पोलीस प्रशासनाने आठवड्याला पडताळणी करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.




