कर्जत-जामखेडसाठी 78 “स्मार्ट किट” मंजूर – सभापती प्रा. राम शिंदे
महिला व बालविकास विभागाकडून 128 लक्ष 35 हजार 680 रुपयांची तरतूद
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड तालुक्यांतील एकूण 78 अंगणवाडी केंद्रांना “स्मार्ट किट” देऊन त्यांना आदर्श अंगणवाडी केंद्रांमध्ये रूपांतरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी महिला व बालविकास विभागातर्फे प्रसिद्ध झाला आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या या संदर्भातल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
या योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रांमध्ये आरोग्य, पोषण आहार आणि पूर्वप्राथमिक शिक्षण या मूलभूत घटकांवर भर दिला जाणार आहे. मुलांना आनंददायी वातावरणात शिक्षण आणि पोषणाचा समतोल अनुभव मिळावा, तसेच किशोरवयीन मुली व महिलांना कौशल्यविकास प्रशिक्षण देण्यावरही विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
याकरिता कर्जत तालुक्यातील 45 आणि जामखेड तालुक्यातील 33 अंगणवाड्यांना प्रत्येकी रु.1,64,560/- या दराने एकूण रु.1,28,35,680/- (अक्षरी रक्कम रुपये एकशे अठ्ठावीस लक्ष पस्तीस हजार सहाशे ऐंशी) किंमतीचे स्मार्ट किट देण्यात येणार आहे.
या किटच्या माध्यमातून अंगणवाड्यांची पायाभूत सुविधा सुधारून शिक्षण, आरोग्य आणि पोषणविषयक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचे उद्दिष्ट आहे.
अंगणवाडी केंद्रांना तांत्रिक आणि शैक्षणिक साधनांनी सक्षम केल्याने बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल, असा विश्वास विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
ही योजना राबविल्याने ग्रामीण भागातील अंगणवाड्यांचा दर्जा उंचावून त्या खऱ्या अर्थाने “आदर्श अंगणवाडी केंद्रांमध्ये” रूपांतरीत होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.