खर्ड्याच्या माजी सरपंचावरील जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ खर्डा येथे मुक मोर्चा

0
627

जामखेड न्युज—–

खर्ड्याच्या माजी सरपंचावरील जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ खर्डा येथे मुक मोर्चा

खर्डा गावचे माजी सरपंच संजय गोपाळघरे यांच्यावर 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ ऐतिहासिक खर्डा किल्ला ते श्री क्षेत्र सिताराम गड या ठिकाणापर्यंत खर्डा ग्रामस्थ, वंजारी समाज सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने दिनांक 26ऑक्टोबर रोजी मूक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी हजारो नागरिक मोर्चामध्ये सहभागी झाले होते.श्री क्षेत्र सिताराम गड येथे मिरवणुकीचे विसर्जन झाल्यानंतर निषेध सभा घेण्यात आली.

यावेळी शेतकरी संघटनेचे सुनील लोंढे श्रीकांत लोखंडे,माजी सरपंच संजय गोपाळघरे,मार्केट कमिटीचे संचालक वैजीनाथ पाटील,पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र सुरवसे यांनी आपल्या मनोगतातून या हल्ल्याच्या संदर्भात व निच प्रवृत्तीच्या माणसाच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा प्रशासनाला इशारा दिला व पोलिसांनी या घटनेमागचा सूत्रधार कोण आहे याचाही शोध घ्यावा अशी मागणी त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.

यावेळी हल्ला झालेले मा.सरपंच संजय गोपाळघरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भावनिक झाले होते ते बोलताना म्हणाले की,माझ्यावर झालेला हल्ला हा प्राणघातक होता या हल्ल्यात वाचण्यासाठी माझ्या आई-वडिलांची पुण्याई तुमच्यासारख्या सर्व लोकांचे माझ्यावर असणारे प्रेम व डॉक्टर भाऊसाहेब गोपाळघरे यांनी माझ्यावर केलेले उपचार माझ्या कामी आले आहेत.

त्यामुळे मी या घटनेतून बचावलो असून या पुढील काळात माझे राहिलेले जीवन हे मी दिन दलित,गरीब व समाजाच्या प्रत्येक घटकासाठी समर्पित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत बोलताना म्हणाले की,ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य केले त्याचबरोबर या घटनेचा तपास आम्ही डीवायएसपी साहेब व एसपी सोमनाथ घार्गे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने करत असून आरोपीविरुद्ध कडक शासन व्हावे अशाप्रकारे आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

यापुढे कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी खर्डा पोलिसांकडून कडक कारवाई करण्याचे त्यांनी सांगितले.आपण सर्वांनी मूक मोर्चा शांततेत पार पाडल्याबद्दल त्यांनी सर्व उपस्थितांचे आमचे मनापासून आभार व्यक्त केले. निषेध सभेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे यांनी मानले. याप्रसंगी जामखेड व खर्डा परिसरातील ग्रामस्थ सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच वंजारी समाजाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here