धक्कादायक बातमी, खर्डा येथील माजी सरपंचावरजीवघेणा हल्ला, आरोपी अटक
जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका इसमाने खर्डा गावचे माजी सरपंचावर धारदार हत्याराने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना खर्डा परिसरात घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खर्डा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीस अवघ्या काही तासांत अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 23 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी सुमारास 6.15 वा. फिर्यादी संजय शिवाजी गोपाळघरे हे मोटारसायकलवरून सितारामगड, खर्डा येथे जात असताना त्यांचा परिचित संतोष उर्फ पोपट जगन्नाथ सुरवसे (रा. वडारवाडा, खर्डा ता. जामखेड) याने त्यांना थांबवून मला पुढे सोडा म्हणून गाडीवर बसला आणि काही क्षणांतच त्याने धारदार वस्तूने फिर्यादीच्या गळ्यावर वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात गोपाळघरे गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी संजय गोपाळघरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 166/2025 भारतीय दंड विधान कलम 109(1), 352 अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.
सपोनि उज्वलसिंह राजपुत यांनी पथकासह तत्काळ तपासाची चक्रे फिरवत आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. आरोपीस न्यायालयात हजर केल्यानंतर चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्गे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस अंमलदार संभाजी शेंडे, वैजिनाथ मिसाळ, अशोक बडे, गणेश बडे आणि योगेश भोगाडे यांचे सहकार्य लाभले.