पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयात सभागृह इमारतीसाठी १४ कोटी ३२ लाख रूपये मंजूर – सभापती प्रा.राम शिंदे

0
177

जामखेड न्युज—–

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयात सभागृह इमारतीसाठी १४ कोटी ३२ लाख रूपये मंजूर – सभापती प्रा.राम शिंदे

जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयात सभागृह इमारत व्हावी याकरिता विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे हाती घेतलेल्या पाठपुराव्यास मोठे यश आले आहे. राज्य सरकारने कृषि महाविद्यालय परिसरात सभागृह इमारत उभारण्यास मंजुरी दिली आहे. त्यासाठी १४ कोटी ३२ लाख ८९ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.

सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांची गैरसोय दुर होण्यास मदत होणार आहे. चोंडीत ६ मे रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी प्रा राम शिंदे यांनी जामखेडकरांसाठी मोठे गिफ्ट दिले आहे.

विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे हे २०१४ ते २०१९ या काळात राज्य सरकारमध्ये मंत्री असताना जामखेड तालुक्यातील हळगाव येथील १०० एकर परिसरात अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिले शासकीय कृषि महाविद्यालय २३/०१/२०१८ रोजी स्थापन करण्यात आले होते. हे महाविद्यालय महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत आहे. प्रा राम शिंदे यांच्या पुढाकारातून कोट्यावधी रूपये खर्चून हळगाव कृषि महाविद्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे.

या महाविद्यालयात राज्यभरातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सदर कृषि महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारती, वसतीगृह इमारती, निवासी इमारती, सुविधा इमारत व ग्रंथालय इमारत इत्यादी इमारतींचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. परंतू सभागृह इमारत नसल्याने महाविद्यालयाचे विविध शैक्षणिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांकरीता विविध व्याख्याने, विविध चर्चासत्रे, कार्यशाळा घेण्यात अडचणी येत होत्या.

ही बाब विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे याच्या लक्षात आल्यानंतर शिंदे यांनी हळगाव कृषि महाविद्यालय परिसरात सभागृह इमारत उभारण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा हाती घेतला होता. त्यानुसार संचालक (विस्तार व शिक्षण), महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी कृषि महाविद्यालय, हाळगाव करिता सभागृह इमारत बांधकामाचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी ७ मार्च २०२४ रोजी सादर केला होता.

त्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाशिक विभागाचे मुख्य अभियंता यांनी तांत्रिक मान्यता प्रदान केली होती. या अंदाजपत्रकात बदल करून शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयाच्या सभागृह इमारत उभारण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी सुमारे १४ कोटी ३२ लाख ८९ हजार रूपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज ५ मे रोजी कृषि, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने जारी केला आहे.

चौकट

हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाविद्यालय परिसरात दर्जेदार मुलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी माझा पाठपुरावा सुरु आहे. महाविद्यालयात सभागृह इमारत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. ती दुर करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता. सरकारने यासाठी १४ कोटी ३२ लाख ८९ हजार रूपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. सभागृह निर्माण होणार असल्याने विद्यार्थ्यांची दुर होण्यास मदत होणार आहे. सरकारने कृषि महाविद्यालयासाठी १४ कोटी रूपयांचा निधी मंजुर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषि मंत्री माणिकराव कोकाटे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मनापासून आभार !

– प्रा राम शिंदे, सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here