छोट्या छोट्या पायांनी शाळेत पाऊल टाकले, गोड हसण्यातून जगाला गोडी दाखवली, चार वर्षांत प्रेमाने, शिकण्यात गती मिळाली, आज मात्र तुमच्या उंच भरारीची वेळ आली. नान्नज मुले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अंगणात आज चार वर्षांचा प्रवास एका हृदयस्पर्शी क्षणात गुंफला गेला. इयत्ता चौथीच्या च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला – एक असा दिवस, जिथे हास्य, उत्साह आणि डोळ्यातले अश्रू एकमेकांत मिसळले होते.
ही मुलं चार वर्षांपूर्वी इथे आली ती लहानशी पावलं टाकत, खणखणीत हसत आणि स्वप्नांच्या डोळ्यांनी. या शाळेने त्यांना आश्रय दिला, आणि त्यांनी शाळेला आनंदाने भरून टाकलं. मैदानात खेळलेले खेळ, वर्गात गायलेली गाणी, शिक्षकांच्या मायेने शिकलेले धडे आणि मित्रा सोबतच्या त्या न विसरणाऱ्या खट्याळ गोष्टी – प्रत्येक क्षणाने ही शाळा त्यांच्या हृदयात कोरली गेली. त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांत रंग भरले, शाळेच्या स्वच्छता मोहिमेत हातभार लावला. या निरोप समारंभ प्रसंगी काही मुलानी शाळेच्या आठवणी आपल्या भाषणातून व्यक्त केल्या.
निरोपाचा क्षण नाही शुभेच्छाचा सण आहे पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारे मन आहे या काव्यपंक्तीची प्रचिती मुलांच्या भाषनातून येत होती.
यावेळी जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित मिशन आरंभ व मंथन परीक्षेत उज्वल यश मिळविलेल्या गुणवंत मुलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमा चे सूत्रसंचालन श्रीमती स्वाती सरवदे मॅडम यांनी केले. शाळेच्या उपाध्यापिका जयश्री दळवी व शिवाली डुचे यांनी आपली मनोगत व्यक्त केले. तालुकास्तर पाककृती स्पर्धेतील यशाबद्दल श्रीमती जयश्री दळवी मॅडम व नारीशक्ती आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीमती शिवाली डुचे मॅडम यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शैक्षणिक वर्ष सन 2025-26 मधील इ 1 ली दाखलपात्र काही मुलांना प्रवेश उत्सव साजरा करत त्यांना इ 1 ली वर्गात प्रवेश देण्यात आला.
शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना इयत्ता 4 थी च्या मुलांनी चार भिंती वरील घड्याळे , दोन फोटो फ्रेम शाळेला भेट दिली.
या वेळी नान्नज मुले शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मजहर पठाण , उपाध्यक्ष श्री. अंगद हजारे , शाळा व्य समिती सदस्य सौ पुजा रजपुत पालक रविसिंग रजपुत, चेअरमन आप्पासाहेब मोहळकर, कानिफनाथ बनकर , सुदर्शन काळे, निलेश सुतार, अंगणवाडी ताई आणि इतर पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री मनोजकुमार कांबळे सर यांनी केले तर सूत्रसंचालन श्री सोमनाथ अनारसे सर यांनी केले व श्रीमती शिवाली डुचे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले. शेवटी गोड जेवणाने कार्यक्रमाची सांगता झाली.