जामखेड न्युज——
अवैध सावकाराच्या खर्डा पोलीसांनी आवळल्या मुसक्या
परिसरात कोणाला अवैध सावकार त्रास देत असल्यास पोलीसांना कळवा – सपोनि विजय झंजाड
व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड केली असतानाही अवास्तव व्याजाची मागणी करू लागल्याने व कोरे चेक घेणार्या सावकारावर खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध सावकाराच्या मुसक्या आवळण्यास खर्डा पोलीसांनी सुरूवात केली आहे. परिसरात कोणाला अवैध सावकार त्रास देत असल्यास पोलीसांना कळवावे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी केले आहे.
याप्रकरणी फिर्यादी बाजीराव मोहन बहादुरे राहणार तेलंगशी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर यांनी सांगितल्या प्रमाणे खर्डा पोलीस स्टेशनला गुरनं 142/2024 भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 308(1)351,352,(2)352(3) सह महाराष्ट्र सावकार अधिनियम 2014चे कलम39 प्रमाणे त्यानुसार पोलिसांनी अशोक रामहरी सुरवसे रा.धामणगाव ता.जामखेड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना पैशांची गरज असल्याने त्यांनी अशोकराव रामहरी सुरवसे याच्याकडून 3%व्याजाने 1लाख रुपये घेतले होते. त्या बदल्यात त्याचे व्याज 40,500/रुपये दिले परंतु यातील सावकार आरोपी अशोक सुरवसे याने 3% ऐवजी 4 % दराने आवास्तव व्याजाचे पैशाचे मागणी सुरू केली.
त्यानंतर यातील सावकाराने फिर्यादी कडून घेतलेले कोरे चेकचा वापर करून त्यावर एक लाख 35 हजार रुपये अशी रक्कम टाकून यातील फिर्यादीने घराचा हप्ता भरण्यासाठी ठेवलेले पैसे आरोपीने परस्पर काढून घेऊन आणखी अवास्तव व्याजाची मागणी करू लागल्याने व छळ करून त्रास देऊ लागल्याने घाबरून यातील फिर्यादी व त्यांची पत्नी यांनी खर्डा पोलीस स्टेशनला धाव घेतली.
याबाबत खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी माहिती घेऊन महाराष्ट्र सावकार अधिनियम 2014 चे कलम 39 प्रमाणे अशोक सुरवसे या सावकारावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनी विजय झंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संभाजी शेंडे, पोलीस कॉन्स्टेबल पंडित हंबर्डे पुढील तपास करीत आहेत.