जामखेड न्युज——
यात्रेत तरुणाचा खून, अहमदनगर जिल्ह्यातील या तालुक्यात घडली भयानक घटना

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील
शहरटाकळी येथे यात्रेनिमित्त छबिना मिरवणुकीत मागील वादातून अक्षय संजय आपशेटे या तरुणाचा खून करण्यात आला. गुरुवारी (दि. २) रात्री पावणेअकराच्या सुमारास ही घटना घडली. शेवगाव पोलिसांनी पाच जणाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून एकास अटक केली आहे.

पोलिसांनी अजय दाविद कोल्हे, किरण उत्तम चव्हाण, पंकज लक्ष्मण कोल्हे, अविनाश साईनाथ पवार, विकास संजय कोल्हे आणि अन्य ४ ते ५ आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

अक्षय यांचा भाऊ संकेत संजय आपशेटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की लक्ष्मीमाता यात्रेत मी व माझा चुलतभाऊ अनिकेत रात्री १०च्या सुमारास फिरत होतो. पावणेअकराच्या सुमारास यात्रेत आरडाओरडा झाल्याचा आवाज आल्याने आम्ही त्या दिशेने गेलो असता लक्ष्मीमाता मंदिराजवळ ग्रामपंचायतीच्या स्ट्रिट लाईटच्या उजेडात अक्षय यास वरील आरोपी सत्तूर, सुरा, फायटर, लोखंडी रॉड व काठ्यांनी मारहाण करीत होते. आम्ही तेथे जाताच आम्हाला पाहून ते पळून गेले.

त्यांनी केलेल्या मारहाणीत अक्षयच्या डोक्याच्या मागील बाजूस, कानाला व मांडीला जबर मार लागल्याने रक्तस्राव होत होता. त्यास ओमकार काकडे, अरुण लोखंडे, नितीन गिरम यांच्या मदतीने शहरटाकळी येथे व नंतर शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री ११.५० वाजण्याच्या दरम्यान अक्षयचा मृत्यू झाला. मयत अक्षय यास मागील वादाच्या कारणातून मारहाण झाल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे.


