जामखेड न्युज——
ज्योती क्रांती मल्टिस्टेटमध्ये कँशिअरला पिस्तूलला धाक दाखवून भरदिवसा दरोडा
धाराशिव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या व जिल्हा स्टेडीयम जवळील सुनीला प्लाझा येथील ज्योती क्रांती मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटीच्या शाखेत शनिवारी दि. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला.
ही दरोड्याची घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे. दरोडेखोरांनी पतसंस्थेचा मॅनेजर व कॅशीयरला पिस्तुल व चाकूचा धाक दाखवून लाखो रूपयांची रोकड व सोन्याचे दागिने लंपास केले. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक गोहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड, आनंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रवीण बांगर यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने तपासाला सुरूवात केली आहे.
धाराशिव शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या समोर सुनील प्लाझा हे व्यापारी संकूल आहे. या संकुलात दुस-या मजल्यावर ज्योती क्रांती मल्टीस्टेट सोसायटी आहे.
सध्या पतसंस्थेच्या वसुलीचे काम सुरू असल्याने काही कर्मचारी वसुलीसाठी बाहेर गेले होते. पतसंस्थेत मॅनेजर व कॅशीयर दोघेच होते. शनिवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास पाच ते सहा दरोडेखोरांनी तोंडाला बांधून पतसंस्थेत दरोडा टाकला. दरोडेखोरांनी पिस्तुल व चाकूचा धाक दाखवून मॅनेजर व कॅशीयर यांना बांधून टाकले. त्यानंतर त्यांनी ७० ते ८० तोळे सोन्याचे दागिने व जवळपास दिड लाखाची रक्कम दरोडेखोरांनी लंपास करून पोबारा केला.
दरोडेखोर पतसंस्थेतून निघून गेल्यानंतर कर्मचा-यांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक उस्मान शेख यांना दरोडा पडल्याची माहिती दिली.
त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक गोहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड, आनंदनगर ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रवीण बांगर यांच्यासह पोलीसांचे पथक डॉग स्कॉड, फिंगरप्रींट तज्ञासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पतसंस्थेची पाहणी करून तपासाचा वेग वाढविला आहे. धाराशिव शहरात एका पतसंस्थेवर भरदिवास सशस्त्र दरोडा पडल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीसांनी दरोडेखोरांचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.