शिक्षक भरती करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन हवेत शिक्षक भरतीला मुहूर्त लागेना, रिक्त जागेमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

0
159

जामखेड न्युज——

शिक्षक भरती करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन हवेत

शिक्षक भरतीला मुहूर्त लागेना, रिक्त जागेमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

 

राज्यात तत्काळ शिक्षक भरती करणार असल्याचे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दिले होते. अभियोग्यता व बुद्धिमतत्ता चाचणी होऊनही आता चार महिने पूर्ण झाले. मात्र, शिक्षकभरती संदर्भात प्रक्रिया सुरू झालेली नाही. भरती कधी करणार, असा सवाल करत डीएड, बीएडधारकांनी उपस्थित केला आहे. शिक्षक भरती करण्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे आश्वासन हवेत विरले आहे. शिक्षक भरतीला मुहूर्त लागत नसल्याने रिक्त जागेमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर शिक्षक भरती करावी असे डीएड, बीएडधारकांची मागणी आहे.

सध्या सरकार एकमेकांचे पक्ष फोडण्यात मशगुल आहेत. विद्यार्थ्यांचे किती नुकसान होत आहे याचे सरकारला कसलेही देणेघेणे नाही.

राज्यात डीएड, बीएडधारकांची संख्या दहा लाखांपेक्षा अधिक आहे. त्यात शिक्षक पात्रता परीक्षा, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी पात्र विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. चार महिन्यांपूर्वी अभियोग्यता चाचणी झाली; मात्र शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होत नसल्याने पात्रताधारक बेरोजगारांमध्ये नाराजी आहे.

डीएड-बीएडधारकांनी या प्रकरणात आता विविध जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत या प्रकरणाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध मागण्यांचे निवेदन डीएड-बीएडधारकांनी दिले. ‘शिक्षणमंत्र्यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात शिक्षक भरतीसंदर्भात ८० टक्के भरती ही तात्काळ करणार असे सांगितले होते.

अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेऊन चार महिने पूर्ण झाले, पण अजूनही शिक्षक भरती संदर्भात प्रक्रिया सुरू झालेली नाही. या कारणास्तव डीएड, बीएड अभियोग्यताधारक विद्यार्थी नैराश्याच्या परिस्थितीत आहेत. या उच्चशिक्षित बेरोजगार उमेदवारांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे,’ असे निवेदनात म्हटले आहे. रामेश्वर काकडे यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.

शिष्टमंडळातील मागण्या
– शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२३ अंतर्गत एकाच टप्प्यात ५५ हजार शिक्षकांची भरती करून अभियोग्यता धारकांस न्याय द्यावा

– पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी

– जाहिरातीतील सर्व प्रवर्गांना समान न्याय मिळण्यासाठी प्रत्येक प्रवर्गाच्या आरक्षणाच्या टक्केवारीनुसार जागा विभागून द्याव्यात

– निवड यादी सोबतच प्रतीक्षा यादीही लावण्यात यावी

– ‘पवित्र पोर्टल’मार्फत एकदा निवड होऊन नोकरी मिळालेले उमेदवारांना पुन्हा पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याची संधी देऊ नये

राज्य सरकार शिक्षकांच्या ६७ हजार जागा रिक्त असल्याचे सांगते. यातील ५५ हजार जागा सरकारने त्वरीत भराव्यात. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा होऊन तीन महिने झाले; तरी अद्याप पवित्र पोर्टल सुरू झालेले नाही. लवकरात लवकर प्रक्रिया सुरू करावी. त्यामुळे राज्यभरातील पात्रताधारकांना दिलासा मिळेल.
– रामेश्वर काकडे, अभियोग्यताधारक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here