जामखेड न्युज——
सत्यजित तांबे आज पत्रकार परिषदेत करणार खुलासा!!

विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवलेले आ.सत्यजित तांबे हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते निकाला पर्यंतच्या घडामोडींचा खुलासा आज शनिवारी प्रथमच करणार आहे.

आज दुपारी चार वाजता नाशिक मधे ते पत्रकार परिषद घेणार असून त्यात ते ऐकून सर्व पडद्याआड झालेल्या विविध राजकीय घडामोडींवर प्रथमच सविस्तर ‘सत्य’ सांगतील असे बोलले जातेय. निवडणुकी दरम्यान ते निकाला नंतर विजय प्राप्त केल्यानंतर त्यांनी राजकीय वक्तव्य कटाक्षाने टाळले होते आणि चार फेब्रुवारीला आपण माध्यमाना पडलेल्या सर्व प्रश्नांचा खुलासा करून तांबे कुटुंबाला निवडणुकीच्या निमित्ताने सामोरे जावे लागलेल्या घटनांची माहिती देऊ असे त्यांनी स्पष्ट केले होते.

उमेदवारी बाबत काँग्रेस वरिष्ठांची भूमिका, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन एबी फॉर्म दिल्याचा दावा, एबी फॉर्म एकच की दोन, प्रदेश काँग्रेस आणि दिल्ली हाय कमांडची भूमिका, मामा आ.बाळासाहेब थोरात यांच्या अलिप्त राहण्याबद्दलचे मत, भाजप’ने दिलेला पाठिंबा वा पक्षात येण्याचे केलेले आवाहन, पुढील राजकीय वाट आणि पक्षीय भूमिका आदी प्रश्नांवर सत्यजित तांबे आज काय खुलासा करतात हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
यानिमित्ताने तांबे यांची पुढील राजकिय वाटचाल पुढे येण्याची शक्यता असल्याने त्यांच्या भूमिकेकडे आज राज्यातील काँग्रेससह मविआ आणि सोबतच भाजपचे लक्ष असणार आहे.






