जामखेड न्युज——
आमदार पुत्रासह 91 जणांवर गुन्हे दाखल!
ग्रामपंचायत वादातून आष्टी तालुक्यातील शिराळा येथे राडा
जिल्हाभरात ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम शांततेत पार पडला. परंतू आष्टी तालुक्यातील शिराळा गावात 16 डिसेंबर रोजी जुन्या वादातून दोन गट समोरासमोर आले. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरुन दोन्ही गटाच्या तब्बल 91 जणांवर आष्टी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आ.बाळासाहेब आजबे यांच्या पुत्राचाही समावेश आहे.
सचिन शत्रुघ्न आजबे (रा. शिराळ ता.आष्टी) यांच्या फिर्यादीनुसार, गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जुन्या वादातून शिवीगाळ करत त्यांच्यासह इतर दोघांना मारहाण केली. यावेळी खिशातील रोख रक्कम व दागिने काढून घेतले. यावरून संग्राम विलास आजबे, महेश चंद्रकांत आबे, यश बाळासाहेब आजबे (आमदार आजबे यांचे पुत्र), गणेश दत्तात्रय आजबे, ज्ञानेश्वर रोहिदास जगताप यांच्यासह इतर 50 जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला. दुसर्या गटाकडून ज्ञानेश्वर रोहिदास जगताप यांनी फिर्याद दिली.
त्यानुसार, लाकडी दांडे, लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन संग्राम आजबे यांच्या खिशातील 5 हजार रुपये व सोन्याची चेन काढून घेतली. याप्रकरणी संजय छत्रभुज आजबे. सचिन छत्रभूज आजबे, ज्ञानेश्वर विकास आजबे, सागर पंढरीनाथ आजबे, विनोद आजिनाथ रोडे, वृदेश्वर बबन आजबे व इतर 30 जणांवर गुन्हा नोंद झाला. असे एकूण दोन्ही गटाच्या तब्बल 91 जणांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक प्रमोद काळे हे करत आहेत.