जामखेड न्युज——
मुख्याधिकारी दंडवते यांच्या नियोजनामुळे घरकुलात नगरपरिषदेने जिल्ह्यात पटकावला प्रथम क्रमांक
जामखेड‘करांच्या शिरपेचात मानाचा तुरा
जामखेडकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. जामखेड नगरपरिषदेला अहमदनगर जिल्ह्यात घरकुल योजनेमध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे. गोर गरीबांना हक्काचे घर मिळावे यासाठी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी केंद्रीय मंत्री तसेच राज्यातील अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन पाठपुरावा केला होता. त्याचबरोबर जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी घरकुल योजनेबाबत प्रभावी अंमलबजावणी केली त्याचेच फलित रूप म्हणून जामखेड नगरपरिषद जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांचा योग्य ताळमेळ असेल तर काय होते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे.
जामखेडमध्ये नागरिकांशी वेळोवेळी संवाद साधून, सरकारी योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी रोहित पवार कायमच प्रयत्नशील असतात. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून जामखेडमधील प्रत्येक प्रभागात बैठका घेऊन वेळोवेळी प्रश्न मार्गी लावण्यात आले. आ. रोहित पवार यांनी वेळोवेळी नागरिक आणि अधिकारी यांच्या संपर्कात राहून व शासकिय पातळीवर केंद्र सरकारकडेही पाठपुरावा केला होता. नागरिकांना घरकुलामध्ये कोणती अडचण येऊ नये म्हणून प्रती घरकुल एक हजार रुपये प्रमाणे खासगी आर्किटेक्चरची नेमणूक देखील करण्यात आली होती. राज्यामध्ये असे करणारी जामखेड ही पहिलीच नगरपरिषद असावी.
जामखेड नगरपरिषदेमध्ये पंतप्रधान आवास योजना अंतर्गत एकूण 739 घरकुले मंजूर झालेली आहेत, यातील 539 घरांचे काम सुरू झाले आहे. 328 घरकुलांची कामे आतापर्यंत पूर्ण करण्यात आलेली असून दुसऱ्या डीपीआरमध्ये 205 घरकुले मंजुर झाली आहेत. पहिल्या डीपीआरमधील मंजूर असलेल्या घरकुलांसाठी अडीच लाखांपैकी 2 लाख 20 हजारांचे अनुदान प्राप्त झालेले आहे. तसेच दुसऱ्या डीपीआरमधील 205 पैकी 189 लाभार्थ्यांना प्रती घरकुल एक लाख रूपयांचे अनुदान प्राप्त झालेले आहे. यातील उर्वरित 16 लाभार्थ्यांना लवकरच अनुदान प्राप्त होणार आहे. त्यामुळे ‘जामखेड’करांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याचं या माध्यमातून स्पष्ट होत आहे.
वर्ष 2021-2022 ची जामखेड तालुक्यातील घरकुल उभारणीची आकडेवारी पाहिली तर एकूण 2173 घरकुल लाभार्थ्यांना मंजूर असून त्यापैकी तब्बल 615 घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे व 1558 घरकुलाचे काम सध्या सुरू आहे. मागच्याच वर्षी जामखेडचा विभागीय स्तरावर दुसरा क्रमांक देखील आला होता. त्यामुळे ही आकडेवारी पाहिली तर नक्कीच एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे मतदारसंघातील प्रत्येक पात्र लाभार्थी कुटुंबाला हक्काचे घर मिळावे यासाठी स्थानिक आमदार रोहित पवार व प्रशासकिय अधिकारी सर्वतोपरी प्रयत्न आणि सहकार्य करत आहेत.
*प्रतिक्रिया* –
मतदारसंघातील प्रत्येक पात्र नागरिकाला विविध सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी मी कायमच प्रयत्न करत असतो. त्यानुसार मतदारसंघातील कोणताही पात्र लाभार्थी घरकुलाच्या योजनेपासून वंचित राहू नये, ही माझी पहिल्यापासूनच भूमिका राहिली आहे. आता घरकुल योजनेत जिल्ह्यात अव्वल स्थान जामखेड नगर परिषदेने मिळवले ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे. मी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
– रोहित पवार
(आमदार, कर्जत – जामखेड)