मानवी जीवनात खेळाला अनन्य साधारण महत्त्व -पद्मश्री पोपटराव पवार

0
308

जामखेड न्युज——

मानवी जीवनात खेळाला अनन्य साधारण महत्त्व -पद्मश्री पोपटराव पवार

क्रीडा स्पर्धेत तीस शाळांमधील एक हजार खेळाडूंचा सहभाग

सामाजिक न्याय विभागाच्यावतीने आयोजित क्रीडास्पर्धा उत्साहात संपन्न

मानवी जीवनात खेळाला अनन्य साधारण महत्व आहे. खेळामध्ये आरोग्य सुदृढ राखण्याबरोबरच मानसिक क्षमतांचा विकास करण्याची क्षमता असून विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना वृद्धिंगत होण्यासाठी मैदानी खेळ निश्चितच उपयुक्त असल्याचे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.

सामाजिक न्याय विभाग व इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्यावतीने वाडिया पार्क, जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितारणप्रसंगी आयोजित कार्यक्रमात श्री पवार बोलत होते.

या प्रसंगी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, सहायक आयुक्त समाज कल्याण राधाकिसन देवढे,जिल्हा कोषागार अधिकारी भाग्यश्री जाधव-भोसले, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती.भाग्यश्री बिले, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले, समाज कल्याण विभागाच्या शासकीय आणि खाजगी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांची सांघिक भावना वृद्धिंगत होण्यास निश्चितच मदत होईल. शालेय व महाविद्यालयीन स्पर्धेंमधून उत्कृष्ट खेळाडू तयार होऊन राज्य पातळीवर आपल्या जिल्ह्याचा या खेळाडूंनी नावलौकिक करावा अशी अपेक्षा व्यक्त करत अहमदनगर जिल्ह्यातून आजपर्यंत अनेक क्रीडा प्रकारांमध्ये विविध खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून पारितोषिक मिळवलेले असून आपण स्वतः सुद्धा या मैदानामुळेच आज इथपर्यंत पोहोचलो असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

तीस शाळांमधील एक हजार खेळाडूंचा सहभाग
या स्पर्धेत जिल्ह्यातील तीस शाळांमधील एक हजार खेळाडूंनी भाग घेतला. गटानुसार घेण्यात आलेल्या या स्पर्धांमध्ये शालेय गटात १ ली ते ४ थी, ५वी ते ७वी, ८ वी ते १०वी व महाविद्यालीं११ वी १२ वी असे मुला-मुलींचे स्वतंत्र गट करण्यात आले. सांघिकमध्ये कबड्डी व खो-खो तर वैयक्तीक मध्ये धावणे १०० मी व ४०० मी. पोहणे, गोळाफेक, थाळीफेक, लांबउडी, तर छोट्या गटासाठी संगीत खुर्ची, लिंबू चमचा, पोती उडी असे करमणूकीचे खेळ यावेळी घेण्यात आले.
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ वाडिया पार्क, जिल्हा क्रीडा संकुल येथे
सहायक आयुक्त समाज कल्याण राधाकिसन देवढे, जिल्हा क्रीडाधिकारी श्रीमती भाग्यश्री बीले, राहूल गांगडे , श्री. खुरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत या क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ करण्यात आला. सर्व खेळाडूंनी जय पराजयाची तमा न बाळगता प्रत्येकाने आपल्या खिलाडू वृत्तीचे दर्शन घडवावे,अशी अपेक्षा उदघाटन कार्यक्रमात व्यक्त करण्यात आली.

या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व समाज कल्याण निरीक्षक, सर्व आश्रम शाळा मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. शाकीर शेख यांनी केले तर आभार विनोद लाड यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here