जामखेड न्युज——
रानडुक्कराच्या हल्ल्यात जामखेड तालुक्यातील शेतकरी गंभीर जखमी
तालुक्यातील वाकी येथील शेतकरी ज्वारी पिकाला पाणी देत असताना रात्री अचानक रानडुक्कराने हल्ला केला. यावेळी शेतकऱ्याने आरडाओरडा केल्याने आसपासचे शेतकरी मदतीला धावले त्यामुळे शेतकऱ्याचे प्राण वाचले. तालुक्यातील घाटमाथ्यावर तसेच ग्रीन पट्टा असलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर रानडुक्कराचा उपद्रव आहे. याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
वाकी ता.जामखेड येथील शेतकऱ्यावर रानडुकराचा प्राणघातक हल्ला, इतर शेतकरी मदतीला धावून आल्याने सुदैवाने प्राणहानी झाली नाही…
याबाबत समजलेली माहिती अशी की,जामखेड तालुक्यातील ग्रीन व्हॅली समजल्या जाणाऱ्या वाकी परिसरातील शेतकरी गहिनीनाथ साहेबराव कोळेकर रा. वाकी वय 62 वर्ष हे दी.10 डिसेंबर रोजी रात्री ज्वारी या पिकाला पाणी देण्यासाठी आपल्या शेतात गेले असता मध्यरात्री दोन वाजता एका रानडुकराने त्यांच्यावर प्राण घातक हल्ला केला, त्यावेळी त्यांनी मोठमोठ्याने आरडा ओरड केल्याने शेजारील शेतकरी मदतीला धावून आल्याने रानडुकराने तिथून पळ काढल्यामुळे कोळेकर यांचा जीव वाचला
त्यांच्या पायाला 25 टाके पडले असून त्यांना खर्डा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
यासंदर्भात ही माहिती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे यांना समजली असता त्यांनी शेतकऱ्याची भेट घेऊन जामखेड येथील वनविभागाचे अधिकारी उबाळे साहेब यांच्याशी संपर्क करून सदर रानडुकरांचा बंदोबस्त करावा तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
वाकी परिसरात उसाचे क्षेत्र भरपूर असल्याने रानडुकरांचा त्या भागात सुळसुळाट झाला असल्याने रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालूनच शेतीला पाणी द्यावे लागत आहे, याबाबत प्रशासनाने योग्य दखल घेऊन पुढील अनर्थ टाळण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी शेतकरी वर्गांमधून होत आहे.