जामखेड न्युज——
महाराष्ट्र केसरी सईद चाऊसवर गुन्हा दाखल
रागातून पैलवानावर चाकूहल्ला; महाराष्ट्र केसरी सईद चाऊसवर गुन्हा दाखल
तालमीतील मल्लाने पराभूत केल्याच्या रागातून, बीडच्या (Beed) आष्टीत पैलवानास बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी 20 जणांविरोधात आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आरोपींमध्ये महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesri) विजेता मल्ल सईद चाऊसचा मुख्य आरोपी म्हणून समावेश आहे. मनोज पवार असे मारहाण झालेल्या मल्लाचे नाव आहे.
मनोज हा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा विजेता मल्ल सईद चाऊस याच्या तालमीत काही दिवस जात होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याने तालीम सोडली होती. दरम्यान काही कुस्ती स्पर्धांमध्ये त्याने सईदच्या तालमीत प्रशिक्षण घेणाऱ्या मल्लांचा पराभव केला होता.
याचा राग मनामध्ये धरून सईद चाऊस आणि त्याच्या तालमीतील इतर मल्लांनी मनोजची दुचाकी अडवून तू पूर्वी आमच्या तालमीत येत होतास, आता का येत नाही ? आमच्या पैलवानांना का पाडताेस ? असे म्हणून बेदम मारहाण केली. त्याच्यावर चाकू हल्ला करुन खिशातील 10 हजार काढून घेतले, असे तक्रारीत सांगण्यात आले आहे.
या प्रकरणी एमएलसी जबाबावरून महाराष्ट्र केसरी सईद चाऊस, त्याचा भाऊ फहाद चाऊस (रा. आष्टी) यांच्यासह मुयरध्वज कणसे रा. तपोवन, अमोल दिंडे (रा. मंगरुळ), इरफान सय्यद, विश्वास तावरे (रा. खानापूर ), प्रविण झगडे (रा. सोलावाडी ), शाशना शेख (रा. आष्टी), ओंकार आंधळे (रा. माणिकदौंडी), सागर पोकळे (रा. मातकुळी) आणि इतर आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या मारहाणीत एक जण जखमी झाला.