१५०० किलो गांजाचे ओडिशा ते बीड कनेक्शन व्हाया नागपूर; पोलिसांनी आष्टीतून दोघांना उचलले

0
237

जामखेड न्युज——

१५०० किलो गांजाचे ओडिशा ते बीड कनेक्शन व्हाया नागपूर; पोलिसांनी आष्टीतून दोघांना उचलले

 

 

नागपूर पोलिसांनी ओडिशा राज्यातून आलेल्या एका ट्रकमधून २ कोटी ३३ लाख बाजारमूल्याचा ७१ बॅगमधील १ हजार ५५५ किलो गांजा बुधवारी पहाटे पकडला. ट्रकमध्ये गांजा कुठून आला आणि कुठे जात होता? यासंदर्भात तपास सुरू असताना नागपूर पोलिसांना याच्या बीड कनेक्शनची माहिती मिळाली. याची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत दोघांना बेड्या ठोकल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ओडिशा राज्यातून निघालेला गांजा हा बीड येथे जात असल्याची गोपनीय माहिती नागपूर पोलिसांना मिळाली होती. यावरून अमली पदार्थ विरोधी पथकाने 16 नोव्हेंबरच्या पहाटे नागपूरच्या कापसी परिसरात ही कारवाई केली. ओडिशामधून सेंद्रिय खत घेऊन निघालेल्या ट्रकमध्ये सेंद्रिय खताच्या शेकडो पोत्यांच्या मध्ये उच्च प्रतीच्या गांजाचे जवळपास ७१ पोते लपवून ठेवण्यात आले होते. पोलिसांना या संदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी विशेष प्रशिक्षित ‘केनाईन डॉग’च्या मदतीने या ट्रकची तपासणी केली आणि त्यामध्ये सुमारे १५५५ किलो गांजा सापडला. याप्रकरणी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील २ जणांचा सहभाग असल्याचे ट्रक चालकाच्या चौकशीत उघडकीस झाले. तपासानंतर मिळालेली माहिती नागपूर पोलिसांनी बीड पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांना दिली. यावरून उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांना दोन पथकांची नियुक्ती केली. आष्टी तालुक्यात संशयितांचा शोध घेण्यात आला. पथकांने सिनेस्टाईल पाठलाग करुन दोघांना बेड्या ठोकल्या.

सुभाष तुकाराम पांडुळे ( ४१, रा.पिंपरी घुमरी), अंबादास राघू झांजे ( ४० , वाहिरा) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर, पोलिस निरीक्षक सलिम चाऊस, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रोहित बेंबर, पीएसआय रवि देशमाने, शिवदास केदार, सपोनि भाऊसाहेब गोसावी, पीएसआय प्रमोद काळे यांनी केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here