जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जिल्हा सहकारी बँकेने शेतकर्यांना दुग्ध व्यवसाया करीता दिलेले कर्जाच्या व्याजात सुट मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रा. मधुकर राळेभात यांनी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष ॲड. उदय शेळके यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात प्रा. मधुकर राळेभात यांनी म्हटले आहे की, आपल्या जिल्हा बँकेने सेवा सोसायट्यांमार्फत साधारण पाच वर्षांपुर्वी गाई घेण्यासाठी एक लाखापर्यंतची कर्जे दिली होती. मात्र दरम्यानच्या काळात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती व दुग्ध व्यवसायातील तोटा यामुळे शेतकरी कर्जाचे हप्ते भरू न व्याज वाढत गेले. पिक कर्जापेक्षा गाईंच्या कर्जास जास्त व्याज दर असल्याने कर्ज व व्याजाची रक्कम वाढतच गेली. आणि या थकीत कर्जामुळे संबंधित शेतकऱ्यांना पिककर्जही मिळाले नाही. परिणामी सबंधित शेतकरी कर्जापासून वंचित राहिले.

आपली जिल्हा बँक ही सहकारी बँक असून ती नफ्यातील बँक आहे. सर्व सामान्य शेतकऱ्यांना सहकार्य करणारी बँक आहे. यामुळे आपण शेतकऱ्यांच्या कर्जावरील ७५ % व्याज (वन टाईम सेटलमेंट) योजने अंतर्गत माफ केल्यास उर्वरित राहिलेली व्याजाची अल्प अशी रक्कम व मुद्दल शेतकरी एक रकमी भरतील व बँकेचीही थकीत रक्कम वसूल होईल. गेले वर्षभरात अनेक बँकांनी कोवीडच्या कारणामुळे उद्योगधंद्याच्या कर्ज व्याजात ३ ते ४ % रिबेट दिलेला आहे.
तरी कोवीड या जागतीक महामारीच्या धास्तावलेल्या काळात शेतकऱ्यांचे थकीत कर्ज व व्याज यांच्या धास्तीतून शेतकऱ्यांना बाहेर काढावे व त्यांच्या जगण्याला नवी उभारी द्यावी अशी मागणी प्रा. मधुकर राळेभात यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.
या निवेदनाच्या प्रति डी. डी. आर अहमदनगर, जिल्हा बँकेचे मॅनेजर, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जामखेड व तालुका सहकारी बँक अधिकारी यांनाही देण्यात आल्या आहेत.