परिवर्तनाच्या वाटेचे वारकरी व्हा – महेश महाराज देशपांडे

0
172
जामखेड प्रतिनिधी 
जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
जाणते-अजाणतेपणी माणसाची पावले गुन्ह्याच्या वाटेवरती पडतात मात्र परिवर्तनाची संधी कायदा आणि पोलिस दलाच्या वतीने प्रत्येकासाठी उपलब्ध असते सर्व धर्मीय संत, ग्रंथ आणी संविधान देखील गुन्हेगारीच्या क्षेत्रातून बाहेर पडण्याची संधी देते आहे त्यामुळे ह्या संधीचा बोध घेऊन परिवर्तनाच्या वाटेचे वारकरी व्हा असे आवाहन समोज प्रबोधनकार महेश महाराज देशपांडे यांनी केले.
जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित टू प्लस आरोपी मेळाव्यात समोज प्रबोधनकार महेश महाराज देशपांडे बोलत होते. यावेळी पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर, सुनील बर्डे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र थोरात तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक निमोणकर, पत्रकार धनराज पवार, यासीन शेख व आरोपी उपस्थित होते.
यावेळी बोलताना महेश महाराज म्हणाले, गुन्हेगारीच्या वाटेवरती लागलेली  पावले सन्मार्गाचा वाटेला लागावीत आणि वेळीच आयुष्य सावरले जावे या उद्देशाने नगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेनुसार दोन गुन्हे दाखल असलेल्या आरोपींच्या प्रबोधनाचे आयोजन करण्यात येत आहे.  जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या आता तरी पुढे हाचि उपदेश नका करू नाश आयुष्याचा या अभंगाचा बोध आरोपी बांधवांनी घ्यावा.  गुन्हेगारीचा रस्ता हा आत्मघातचा आहे. या वाटेवरती आयुष्याचा नाश होणे क्रमप्राप्त आहे. सर्वधर्मीय तत्त्वज्ञानाने परिवर्तनाची संधी प्रत्येकाला दिली आहे. कुराण, गीता, बायबल आणि गुरु ग्रंथ साहिब आपल्याला हेच आवाहन करतात. संविधानाचे रक्षक असलेले पोलीस दल देखील आपल्या मदतीसाठी हात पुढे करीत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कायदा आणि पोलिसांचे आवाहन लक्षात घेऊन माणुसकीच्या वाटेचे अर्थात परिवर्तनाचे वारकरी व्हा असे आवाहन महेश महाराज देशपांडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड म्हणाले, जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्या या या उपक्रमामागील संकल्पनेचा हेतू दुरितांचे तिमिर जावो आणि खळांची व्यंकटी सांडो हाच आहे. तुम्हाला या उपक्रमातून सुधारण्याची संधी देऊ केली आहे. गुन्हेगारी वाट सोडून सन्मार्गाचा रस्ता स्विकारावा आणि सुजाण नागरिक म्हणून ओळख करावी आणि समाज प्रबोधनकार महेश महाराज देशपांडे यांच्या आवहानाचा अंगीकार करावा. यावेळी पसायदान होऊन कार्यक्रमाचा समारोप झाला.सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here