शेतकऱ्यांच्या अडचणीत मदतीला धावले गावातील युवक
जामखेड न्युज——
प्रत्येक शेतकऱ्यांला आता ‘ई-पिक पाहणी’ ॲपच्या माध्यमातून पीक पेऱ्याची नोंदणी करावी लागत आहे. शेतकऱ्यांच्या घरात अठरा विश्व दारिद्रय यातच अधूनमधून अस्मानी आणि सुलतानी संकटामूळे कायम परिस्थितीचे चटके सोसणाऱ्या हातात मोबाईल फोन नाही. असलाच तरी परिपूर्ण माहिती नसल्यामुळे ही नोंदणी बळीराजासाठी त्रासदायक ठरु लागली आहे.
अशाच ग्रामीण भागातील अज्ञानी शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन कोण करणार, हा प्रश्न निर्माण झाला असताना त्यांच्या या अडचणीच्या दिवसात गावातील अनिकेत कुलकर्णी आणि त्यांचे मित्र मदतीसाठी पुढे आहे आहेत.
ज्या शेतकऱ्याला ऑनलाईन पीक पेऱ्याची नोंदणी करता येत नाही अश्या शेतकऱ्यांना मोफत नोंदणी करून देण्याचे कार्य या युवकांनी २५ सप्टेंबरपासून सुरू केले आहे. ते कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन बळीराजाला मदत करत आहेत यामुळे बळीराजा या पीक पेऱ्याच्या त्रासातून सुटलेला आहे. कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम करून 2 गावातील 400 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा पीक पेरा ॲप च्या माध्यमातून भरून दिला आहे. अनिकेत कुलकर्णी हे विविध सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असतात आणि या पुढील काळात पिकपेऱ्याची नोंदणी करताना शेतकऱ्यांना कुठलीही अडचण आल्यास आपण सदैव तयार राहू, असा विश्वास देतानाच नोंदणीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन अनिकेत कुलकर्णी यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
या कामामध्ये अनिकेत यांना त्यांचे सहकारी विशाल कांबळे, विकास बिरंगळ यांनी सहकार्य केले. या सर्व ठिकाणी त्यांना सोनेगाव चे तलाठी प्रमोद काटरनवरे आणि सरपंच पद्माकर बिरंगळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.