जामखेड न्युज——
आमदार रोहित पवारांचा सर्वात मोठा रावण दहन कार्यक्रम वादात
अदिवासी संघटनांचा रावण दहणाला विरोध
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे आपल्या मतदारसंघात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम कायमच राबवत असतात. गतवर्षी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर त्यांनी जामखेड तालुक्यातील खर्डा येथील शिवपट्टन किल्ल्यावर जगातील सर्वात उंच स्वराज्य ध्वजाची उभारणी करून समतेचा, एकतेचा आणि बंधुभावाचा संदेश दिला होता. यंदाच्या वर्षीही आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून खर्डा येथील शिवपट्टन किल्यासमोर डौलाने फडकत असलेल्या देशातील सर्वात उंच स्वराज्य ध्वजाच्या साक्षीने महाराष्ट्रातील सर्वात उंच रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दिनांक ३ ऑक्टोबर २०२२ रोजी संध्याकाळी ५ वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अदिवासी संघटनांनी विरोध केला आहे. ट्रायबल फोरम अदिवासी संघटनेने फोन मोहीम सुरू केली आहे.
आमदार रोहित पवारांनी रावण दहनाविषयी सांगितले की, सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला भेडसावत असलेल्या महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, स्त्री असुरक्षा, जाती-धर्म भेद, बालमजुरी, शेतकरी आत्महत्या, पर्यावरण नाश, अवैज्ञानिकता, दारिद्रय या दहा महत्त्वाच्या समस्येतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी ही दहा तोंड असलेल्या रावणाच्या प्रतिकृतीचे दहन केले जाणार आहे.
दसऱ्याला अनिष्ट चालीरीती आणि प्रवृत्तींना थारा न देण्यासाठी त्यांचे दहन करण्याची परंपरा आहे. आपल्या या संस्कृती आणि परंपरेला अनुसरूनच राज्यातील आजवरच्या सर्वात उंच रावणाच्या प्रतिकृतिचे दहन करण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. या कार्यक्रमासाठी खर्डा येथे युवराज संभाजीराजे छत्रपती तसेच लोकप्रिय पौराणिक रामायण मालिकेतील राम, सीता, लक्ष्मण यांची भूमिका साकारलेले कलाकार, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
खर्डा येथे आजवरची राज्यातील सर्वात उंच म्हणजेच ७५ फुटी रावणाची प्रतिकृती मुंबईच्या मनश्री आर्ट्सच्या माध्यमातून साकारली जाणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने कर्जत जामखेड तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार रोहित पवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
रावण दहनाला विरोध करणाऱ्या ट्रायबल फोरम अदिवासी संघटनेचे दिलीप आंबवणे यांनी सांगितले की, आता आदिवासी समाज जागृत झाला आहे
महाराष्ट्र, छत्तीसगढ, मध्यप्रदेश येथे मोठ्या प्रमाणात रावणाची पुजा करतात. रावण अदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करत होते समाजाच्या भावना दुखावतात. समाजाला रावणाबद्दल माहिती नाही रावणाचे चरित्र वाचावे समाजात मोठे गैरसमज आहेत जेथे जेथे रावण दहन होते तेथे तेथे आम्ही विरोध करणार आहोत.