जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——
बारामतीवर बोलण्याआधी कर्जत-जामखेडचा सामना करावा -आमदार रोहित पवार
आमदर प्रा. राम शिंदे यांनी अगोदर कर्जत जामखेड मधील आव्हानास सामोरे जावे, मग बारामती लोकसभा मतदारसंघावर बोलावे असे आवाहन आ.रोहित पवार यांनी आ. राम शिंदे यांनी बारामतीत पत्रकार परिषद घेऊन आगामी २०२४ ला बारामतीत भाजपचाच खासदार राहिल या विधानाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना आ. रोहित पवार यांनी वरील वक्तव्य केले.
आ. रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत-जामखेड मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या वतीने विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असून विविध ठिकाणी उपस्थित राहून ते नागरिकांकडून होणारे सत्कार व शुभेच्छांचा स्वीकार स्विकारत आहेत. या दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध विकास कामांचा आढावा घेत असताना विरोधकांनी केलेल्या टीका व आरोपांचा समाचार घेताना. त्यांच्यावर सडकून टीका केली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सावळेश्वर उद्योग समूहाचे रमेश आजबे, अमोल गिरमे, प्रविण उगले, शिंगवी चष्माघरचे अभय शिंगवी, महेश राळेभात यांच्या सह अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आ. राम शिंदे यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढविण्याच्या केलेल्या आव्हानास उत्तर देताना आ. पवार म्हणाले की, त्यांनी अहंकार दाखवत मला आव्हान दिले होते. मी लोकांच्या व कार्यकर्त्यांच्या विश्वासावर त्यांचे आव्हान स्वीकारले होते. त्यावेळी मी म्हणालो होतो की, तुम्ही अगोदर आज आमदारकीचा राजीनामा द्यावा व उद्या मी राजीनामा देईल या माझ्या आव्हानावर त्यांनी शब्द काढला नाही. त्यांनी अगोदर यावर बोलावे नंतर बारामती लोकसभा मतदारसंघावर बोलावे अशी खोचक टिका आ. राम शिंदे यांनी बारामती लोकसभा संदर्भात केलेल्या टिपण्णीवर केली आहे.
तसेच वेदांता-फॉक्सकॉनवरुन राज्यातील युवांना नोकरी मिळणार नाही यावर आमदार रोहित पवार म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेदांताबाबत सगळ्या गोष्टी फायनल झाल्या होत्या. यामध्ये तळेगावची जागा टॅक्स बेनिफिट व इतर सर्व गोष्टी फायनल झाली असताना ५ सप्टेंबरला वेदांताचे प्रमुख अग्रवाल हे पंतप्रधान यांना भेटले. त्यानंतर सर्वच गोष्टी बदलायला लागल्या. कदाचित या सरकारने देखील प्रयत्न केलेले असतील पण ते पुरेसे ठरले नाहीत.
महाराष्ट्रात जागा निश्चिती केली असतानाही राजकीय उदासिनतेमुळे गुजरातमध्ये गेलेला हा उद्योग अजूनही तिकडं जागेचा शोध घेतोय. हा म्हणजे एकीकडं जेवण तयार असतानाही त्याकडं दुर्लक्ष करुन दुसरीकडं जेवण बनवण्यासाठी लाकूडफाटा जमा करण्यासारखा प्रकार आहे.
”वेदांता-फॉक्सकॉनवरुन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करुन राज्यातील युवांना नोकरी मिळणार नाही. त्यामुळं डबल इंजिनचा प्रचार करणाऱ्या राज्य सरकारने हा उद्योग महाराष्ट्रातच झाला पाहिजे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडे आग्रह धरावा ही विनंती!” असेही आ. रोहीत पवार म्हणाले.
जामखेड तालुक्यात अनेक लोकांना घरकुल मंजुर झाले त्यासाठी आपण महाविकास आघाडी सरकार असताना कर्जत व जामखेड मधील घरकुल धारकांसाठी राज्याचा जो हिस्सा होता तो मंजूर करून आणला होता. पण केंद्राचा हिस्सा अद्याप मिळाला नाही. तो केंद्राकडे प्रयत्न करून आणावा लागेल पण जागा नसल्याने जे घरकुल दिव्यांग व सर्व सामान्य लोकांचे होऊ शकत नाही. यासाठी आपण कर्जत येथे ६०० घरकुल धारकांना जागा व घरे देण्यासाठी जे प्रयत्न केले त्याच धर्तीवर जामखेड येथे प्रयत्न करू असे आ. रोहीत पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले.