आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नामुळे लंम्पी लसीकरण पुर्ण करणारा कर्जत-जामखेड राज्यातील पहिला मतदारसंघ , लसीकरण मोहिमेसाठी एकूण 1.50 लाख लसीचे केले मोफत वितरण

0
168

जामखेड न्युज——

आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नामुळे लंम्पी लसीकरण पुर्ण करणारा कर्जत-जामखेड राज्यातील पहिला मतदारसंघ , लसीकरण मोहिमेसाठी एकूण 1.50 लाख लसीचे केले मोफत वितरण

राज्य सरकारच्या लंपी लसीकरण मोहीमेपूर्वीच आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघात जनावरांचे लसीकरण पूर्ण

लसीकरण मोहिमेसाठी एकूण 1.50 लाख लसीचे केले मोफत वितरण; राज्यात ठरला पहिला मतदारसंघ

महाराष्ट्रात सध्या लंपी या आजाराने अनेक पाळीव प्राणी ग्रस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या आजाराचा प्रसार हा मोठ्या प्रमाणात वेगाने होत आहे. विषाणूजन्य साथीचा असलेला हा आजार आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाकडे सध्या लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आणि याच पार्श्वभूमीवर पशुपालकांची व जनावरांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्याकडून मोफत लस उपलब्ध करून देण्यात आल्या. पहिल्या टप्प्यात 1 लाख जनावरांना पुरतील एवढ्या लस उपलब्ध करून देण्यात आल्या असून आणखी गरज लक्षात घेऊन त्यांच्या माध्यमातून अजून 50 हजार लस पाळीव जनावरांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. फक्त गाई आणि वासरांना सध्या लसीकरणाची गरज असून म्हशींना सध्या गरज नसल्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. राज्य सरकारचे लंपीवरील लसीकरण सुरू होण्याआधीच आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघात जनावरांचे 80 टक्क्यांहून अधिक लसीकरण पूर्ण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून व शासनाच्या मदतीविना लंपी लसीकरण पूर्ण होत असलेला कर्जत जामखेड हा महाराष्ट्रातील पहिला आणि एकमेव मतदारसंघ ठरला आहे.

लसीकरण सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या तीन दिवसांत कर्जत तालुक्यात 37 हजारांहून अधिक तर जामखेड तालुक्यात 21 हजारांहून अधिक जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले होते. साधारणतः आतापर्यंत मतदारसंघातील 70-80 टक्क्यांहून अधिक गावांपर्यंत लसीकरण पोहोचले आहे. वाड्या-वस्त्यांवर भर पावसात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जावून डाॅक्टर्स लसीकरण पूर्ण करत आहेत.

वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आमदार रोहित पवार हे कायमच काम करत असतात. अशातच सध्या असलेली गरज लक्षात घेऊन त्यांच्याडून लंपी लसीकरण मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवली जात आहे. तसेच या माध्यमातून पशुपालक व पाळीव प्राण्यांना देखील मदत होत आहे. यापूर्वी मागच्या वर्षी जेव्हा या आजाराने तोंड वर काढलं होतं. तेव्हा देखील आ. रोहित पवार यांनी ५० हजार लसीचे डोस मोफत पशुवैद्कीय रुग्णालयांना उपलब्ध करून दिले होते. यंदाच्या वर्षी देखील त्यांनी आता एकूण दीड लाख जनावरांना पुरतील एवढ्या लसीच्या मात्रा मोफत उपलब्ध करून दिल्याने पशुपालक यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

लंपी रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी कर्जत-जामखेड मतदारसंघात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेत सरकारी व खासगी डॉक्टर, कर्मचारी व त्यांच्या मदतीला शिरवळ जि. सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाची संपूर्ण टीम अत्यंत वेगाने आणि प्रभावीपणे ही मोहीम राबवत आहे. यासोबतच आ. रोहित पवार यांची संपूर्ण यंत्रणा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी हे देखील लसीकरणासाठी मदत करत आहेत. या दरम्यान पशुपालकांना योग्य त्या उपाययोजनांबाबत देखील मार्गदर्शन करण्यात येत आहे. क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. विलास अहिरे यांचं देखील या मोहिमेत खूप मोलाचं सहकार्य मिळत आहे. अनेक गावातील लोक स्वतः संपर्क कार्यालयात फोन करून आमच्या भागात लस कधी उपलब्ध होणार याची विचारणा करत आहेत. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांनी देखील या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतल्याचं या माध्यमातून पाहायला मिळत आहे.

प्रतिक्रिया

आज एका जनावराची किंमत ही लाखांहून अधिक आहे. लंपी या विषाणूजन्य आजारामुळे जर जनावर दगावला तर शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. हे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

– आ. रोहित पवार, (कर्जत-जामखेड विधानसभा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here