जामखेड न्युज – – –
सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ येथे डॉक्टर कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी 8 खासगी सावकारांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
मृतांमध्ये डॉक्टर माणिक यल्लाप्पा व्हनमोरे यांच्यासह घरातील सदस्यांच्या समावेश आहे. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. सध्या मिरज ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केलाय. आत्महत्या केलेले पोपट वनमोरे यांच्या खिशात एक चिठी सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या चिठ्ठीत काही लोकांची नावे आणि सांख्यिकी आकडेवारी आहे. यावरूनच पोलिसांनी आठ खासगी सावकाऱ्यांना ताब्यात घेतल्याचे समजते. त्यांची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केलीय. दरम्यान, दुसरीकडे गुप्तधनासाठी या कुटुंबाने कर्ज काढले. त्यामुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली, अशी चर्चाही सुरू आहे.
म्हैसाळ येथे पशुवैद्यकीय डॉक्टर माणिक यल्लाप्पा व्हनमोरे यांच्या संपूर्ण कुटुंबांने आत्महत्या केली आहे. कुटुंबातील साऱ्या सदस्यांनी विष घेतल्याचे समजते. मृतांमध्ये डॉ. माणिक येलाप्पा वनमोरे, आक्काताई वनमोरे (आई), रेखा माणिक वनोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा) आणि पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) यांचा समावेश आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी उशिरापर्यंत त्यांच्या घराचा दरवाजा बंद असल्याने ग्रामस्थांना संशय आला. यावेळी दवाखान्यातील कर्मचारी आणि ग्रामस्थांनी त्यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही मोबाइल उचलत नसल्याने त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता, कुटुंबातील सर्व जण मृत अवस्थेत आढळून आल्याने त्यांना धक्का बसला.