आशिया खंडातील नंबर 1 समजल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आता चांगलाच रंगत आली आहे. 3836 मतदार 21 संचालकांचे भविष्य ठरवणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी मोठी खेळी केली आहे.
जिल्ह्यात सध्या बिनविरोध निवडणुकीचे वारे वाहत असताना, राम शिंदे यांनी आपल्या समर्थक मतदारांना घेऊन सहलीचे आयोजन केले आहे. “मतदारांची सहल; राम शिंदेंसोबत मतदार रवाना” असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडतंय? सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्याच दिवशी बँकेच्या निवडणुकीसाठी 361 उमेदवारी अर्ज नेण्यात आले आहेत. अनेक इच्छुक आता मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड सह जामखेड तालुक्यातील मतदारांना एकत्र करत सहलीचे नियोजन केले आहे.
येत्या दोन दिवसात राम शिंदे स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत असे त्यांनी स्पष्ट केले आहे. संगमनेर येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला ते उपस्थित नव्हते, मात्र बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्याशी संपर्क साधल्याचे त्यांनी सांगितले.
शिंदे म्हणाले – _”सहकारात सर्वांना सोबत घेऊन जायचे असते. बँक वाचली पाहिजे, जगली पाहिजे. बिनविरोधसाठी मी सकारात्मक आहे, पण कोणी स्वतःचा अजेंडा चालवत असेल तर निवडणूक बिनविरोध होणार नाही.”_
दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी “राम शिंदेंना जिल्हा बँक निवडणूक लढवताच येणार नाही” असा दावा करत टोला लगावला आहे.
एकंदरीत, मतदार सहलीच्या निमित्ताने राम शिंदे यांनी शक्तिप्रदर्शन सुरू केले असून, या निवडणुकीत मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.