Tuesday, September 29, 2026
Home ताज्या बातम्या रोहित पवारांच्या वाढदिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य! सागर मराठांकडून शालेय साहित्य...

रोहित पवारांच्या वाढदिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य! सागर मराठांकडून शालेय साहित्य अन् शाळेस संगणक भेट

0
2
रोहित पवारांच्या वाढदिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य!  सागर मराठांकडून शालेय साहित्य अन् शाळेस संगणक भेट

जामखेड न्युज – – – – – – 

रोहित पवारांच्या वाढदिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य!

सागर मराठांकडून शालेय साहित्य अन् शाळेस संगणक भेट

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाचा खर्च केवळ उत्सवावर न करता समाजोपयोगी उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला हातभार लावण्याचा स्तुत्य उपक्रम पिंपळगाव उंडा येथे राबविण्यात आला. मैत्री ग्रुप भारत देश चे संस्थापक अध्यक्ष सागर गवसणे (मराठा) तसेच आमदार रोहित पवार मित्रमंडळाच्या वतीने परिसरातील दुष्काळी परिस्थिती पाहता पिंपळगाव उंडा येथील जिल्हा परिषद शाळा व चनाप्पा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उत्साह पाहून सामाजिक उपक्रमाचे समाधान आयोजकांना मिळाले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाल्याने त्यांच्या शैक्षणिक गरजा काही प्रमाणात पूर्ण होण्यास हातभार लागणार आहे.

याच उपक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणून पिंपळगाव उंडा जिल्हा परिषद शाळेला सुमारे २५ हजार रुपये किमतीचा संगणक भेट देण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळावे, संगणक शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी आणि डिजिटल शिक्षणाला चालना मिळावी, या उद्देशाने ही संगणक भेट देण्यात आली.

यावेळी आमदार रोहित पवार यांना भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देणारे बॅनरही लक्षवेधी ठरले. वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक साहित्य वाटप व संगणक भेटीचा उपक्रम राबविल्याबद्दल उपस्थितांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सोनेगाव चे माजी सरपंच चत्रभुज बोलभट यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने समाजासाठी योगदान देणारे उपक्रम राबविण्याची परंपरा कार्यकर्त्यांनी जोपासावी, असे मत व्यक्त केले. वाढदिवस साजरा करण्याचा हा सामाजिक दृष्टिकोन निश्चितच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्याध्यापक मुकुंद सातपुते यांनी शाळेला संगणक भेट मिळाल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाच्या माध्यमातून शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून, ही मदत विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.

वाढदिवसानिमित्त केलेली ही २५ हजार रुपयांची संगणक भेट आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप हा समाजोपयोगी उपक्रम ठरला. वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रम राबवून समाजाप्रती असलेली बांधिलकी जपल्याचे यावेळी दिसून आले.

या कार्यक्रमास चत्रभुज बोलभट, मुख्याध्यापक मुकुंद सातपुते, चंद्रकांत गाडेकर, अमोल जाधव, भाऊसाहेब इथापे, अमोल ढगे, अविनाश नवसरे, जनार्दन आजबे, गौतम ओमासे, शिवराज जाधव यांच्यासह शिक्षक, कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!