जामखेडच्या कला केंद्रात आरोपींची धरपकड, ‘खुनाशी आमचा संबंध नाही’—सप्तसूर चालकांचा दावा
धुळे जिल्ह्यातील मोहाडी पोलिसांनी ३१ वर्षीय गर्भवती महिलेच्या निर्घृण खून प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत छडा लावत दोन महिलांसह चार आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपींना जामखेड येथील सप्तसूर कला केंद्र परिसरातून ताब्यात घेण्यात आल्याने या घटनेची चर्चा जामखेडमध्येही रंगली आहे. मात्र, या प्रकरणाशी सप्तसूर कला केंद्राचा कोणताही संबंध नसल्याचा स्पष्ट खुलासा कला केंद्राचे चालक रवी अंधारे यांनी केला आहे.
धुळे जिल्ह्यातील मोहाडी परिसरात पिंकी हनुमंत काटकर (वय ३१, रा. रायगड) या महिलेची अत्यंत निर्घृणपणे हत्या झाल्याची घटना समोर आली होती. संबंधित महिला गर्भवती असल्याने या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास मोहाडी पोलिसांनी वेगाने करत अवघ्या तीन दिवसांत गुन्ह्याची उकल केली. तपासादरम्यान दोन महिलांसह चार संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, या प्रकरणातील मृत महिला आणि आरोपी जामखेड येथील सप्तसूर कला केंद्रात कामाला होते, अशा स्वरूपाचे वृत्त काही ठिकाणी प्रसिद्ध झाले होते. यामुळे सप्तसूर कला केंद्राचे नाव या प्रकरणाशी जोडले गेले. मात्र, ‘मृत महिला किंवा संबंधित आरोपी आमच्या कला केंद्रात कामाला नव्हते. ते काम मागण्यासाठी येथे आले होते. त्यांचा आणि सप्तसूर कला केंद्राचा कोणताही संबंध नाही,’ असा स्पष्ट दावा कला केंद्राचे चालक रवी अंधारे यांनी केला आहे.
अंधारे यांनी सांगितले की, संबंधित आरोपी कला केंद्रात काम मागण्यासाठी आले होते. मात्र त्यांना येथे काम देण्यात आले नव्हते. पोलिसांनी त्यांना कला केंद्राच्या वाहनतळातून ताब्यात घेतले, एवढाच या घटनेचा कला केंद्राशी संबंध आहे. त्यांच्यात नेमका कोणता वाद झाला, तो कुठे झाला आणि त्यानंतर त्यांनी काय केले, याबाबत कला केंद्र व्यवस्थापनाला कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘त्यांचे आपापसातील वाद कला केंद्राच्या बाहेर झाले असून पुढील घटनादेखील केंद्राबाहेरच घडल्या आहेत. त्यामुळे या गुन्ह्याशी सप्तसूर कला केंद्राचा कोणताही संबंध जोडू नये,’ असे रवी अंधारे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मोहाडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत कौशल्याने करत चार आरोपींना अटक केली आहे. या हत्येमागील नेमके कारण, आरोपींमधील वादाचे स्वरूप आणि घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी तपासातून समोर येणार आहे.
या प्रकरणामुळे जामखेडमधील कला केंद्राचे नाव चर्चेत आल्याने सप्तसूर कला केंद्र चालकांनी आपली बाजू स्पष्ट करत संबंधित महिला अथवा आरोपी कला केंद्रात कार्यरत नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील आरोपींचा कला केंद्राशी नेमका कोणताही संबंध होता का, याबाबत पोलिस तपासातील अधिकृत माहिती महत्त्वाची ठरणार आहे.