Wednesday, August 5, 2026
Home क्राईम न्यूज जामखेडमध्ये दिव्यांग घरमालकाची लाखमोलाची फसवणूक; विश्वास संपादन करून बनावट ठेकेदार पसार

जामखेडमध्ये दिव्यांग घरमालकाची लाखमोलाची फसवणूक; विश्वास संपादन करून बनावट ठेकेदार पसार

0
2

जामखेड न्युज – – – – – – – 

जामखेडमध्ये दिव्यांग घरमालकाची लाखमोलाची फसवणूक; विश्वास संपादन करून बनावट ठेकेदार पसार

 

जामखेड शहरात स्वतःला मोठा बांधकाम ठेकेदार असल्याचे भासवत एका अज्ञात भामट्याने दिव्यांग घरमालकाची तसेच एका मजुराची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्वस्तात आणि दर्जेदार घर बांधून देण्याचे आमिष दाखवत आरोपीने घरमालकाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दोन मोबाईल फोन आणि रोख रक्कम घेऊन तो फरार झाला. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड शहरातील जुने कोर्ट रोडवरील काशीद हॉस्पिटल परिसरात राहणारे दत्ता जाधव व सचिन जाधव यांच्या दोन मजली घराचे बांधकाम सुरू होते. घरासमोर बांधकाम साहित्य पाहून एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. कमी खर्चात उत्कृष्ट दर्जाचे काम करून देण्याचे आश्वासन देत त्याने जाधव कुटुंबाचा विश्वास संपादन केला. दोघांमध्ये सुमारे ३० हजार रुपयांत काम करण्याचे ठरले.

विश्वास वाढावा म्हणून जाधव कुटुंबाने आरोपीला राहण्यासाठी घराखालील रिकामी खोलीही उपलब्ध करून दिली. दुसऱ्या दिवशी त्याने काही मजुरांना कामावर बोलावले. घरमालकाचा नातेवाईक असल्याचा समज झाल्याने मजुरांनी कोणतीही शंका न घेता काम सुरू केले.

काम सुरू असताना आरोपीने एका मजुराकडून फोन करण्याच्या बहाण्याने सुमारे १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल घेतला. त्यानंतर घरमालक सचिन जाधव यांना एका खात्यावर दोन हजार रुपये ऑनलाइन पाठवण्यास सांगून त्याबदल्यात रोख रक्कम देण्याचे आश्वासन दिले. पुढे दिव्यांग असलेल्या सचिन जाधव यांचा विश्वास जिंकत त्यांचाही मोबाईल स्वतःकडे घेतला. त्यानंतर त्यांना बीड कॉर्नर परिसरात नेऊन एका मोबाईल दुकानातून दोन हजार रुपये रोख घेतले. त्यापैकी २०० रुपये सचिन जाधव यांच्या हातात देत, “मजुरांसाठी खाण्याचे साहित्य घेऊन या,” असे सांगून त्यांना दुकानात पाठवले. याच संधीचा फायदा घेत आरोपी दोन्ही मोबाईल आणि उर्वरित रक्कम घेऊन पसार झाला.

बराच वेळ आरोपी परत न आल्याने सचिन जाधव यांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही मोबाईल बंद असल्याचे निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जामखेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!