Wednesday, November 11, 2026
Home ताज्या बातम्या गुरुमाऊली वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जामखेडच्या वैभवात मोलाची भर पडणार – नगराध्यक्षा...

गुरुमाऊली वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जामखेडच्या वैभवात मोलाची भर पडणार – नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी! शिक्षणाशिवाय प्रगती नाही, संतविचारांशिवाय संस्कार नाहीत! गुरुमाऊली वारकरी शिक्षण संस्थेचा भूमिपूजन सोहळा थाटात संपन्न!

0
2
गुरुमाऊली वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जामखेडच्या वैभवात मोलाची भर पडणार – नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी!  शिक्षणाशिवाय प्रगती नाही, संतविचारांशिवाय संस्कार नाहीत! गुरुमाऊली वारकरी शिक्षण संस्थेचा भूमिपूजन सोहळा थाटात संपन्न!

जामखेड न्युज – – – – – 

गुरुमाऊली वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जामखेडच्या वैभवात मोलाची भर पडणार – नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी!

शिक्षणाशिवाय प्रगती नाही, संतविचारांशिवाय संस्कार नाहीत! गुरुमाऊली वारकरी शिक्षण संस्थेचा भूमिपूजन सोहळा थाटात संपन्न!

 

शिक्षण हे माणसाच्या प्रगतीचे साधन आहे, तर संतांचे विचार हे जीवनाला संस्कारांची दिशा देणारे आहेत. शिक्षणाशिवाय प्रगती नाही आणि संतांच्या विचारांशिवाय संस्कार नाहीत. वारकरी परंपरा, अध्यात्म, भक्ती आणि संस्कार यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या गुरुमाऊली वारकरी शिक्षण संस्थेमुळे जामखेडच्या धार्मिक व सांस्कृतिक वैभवात निश्चितच भर पडेल, असे प्रतिपादन जामखेड नगरपरिषदेच्या लोकनियुक्त प्रथम नगराध्यक्षा प्रांजलताई अमित चिंतामणी यांनी केले.

जामखेड शहरातील नगर रोड परिसरात कावेरी हॉटेलच्या मागील बाजूस बुधवार, दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी श्री गुरुमाऊली वारकरी शिक्षण संस्थेचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.

या संस्थेचे भूमिपूजन ह.भ.प. केशवजी जगदाळे गुरुजी, ह.भ.प. कैलास महाराज भोरे आणि ह.भ.प. सुरेश महाराज कोल्हे यांच्या शुभहस्ते विधिवत करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जामखेड नगरपरिषदेच्या लोकनियुक्त प्रथम नगराध्यक्षा सौ. प्रांजलताई अमित चिंतामणी आणि नगरसेवक अमितशेठ चिंतामणी उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी म्हणाल्या की, आजच्या आधुनिक युगात भौतिक शिक्षणाबरोबरच अध्यात्मिक आणि नैतिक संस्कारांचीही नितांत गरज आहे. संत-महात्म्यांनी दिलेला मानवतेचा, समतेचा, भक्तीचा आणि सदाचाराचा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. गुरुमाऊली वारकरी शिक्षण संस्था या माध्यमातून वारकरी परंपरा जपण्याचे आणि भावी पिढीला संस्कारक्षम बनविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करेल. या संस्थेमुळे जामखेडच्या वैभवात भर पडणार असून, संस्थेच्या प्रगतीसाठी नगरपरिषदेच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. मृदंगविशारद ज्ञानेश्वर महाराज कोल्हे यांच्या पुढाकाराचे आणि वारकरी शिक्षणासाठी घेतलेल्या परिश्रमांचे विशेष कौतुक करण्यात आले. वारकरी संप्रदायाची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.
संस्थेला मार्गदर्शक म्हणून ह.भ.प. राम महाराज पोळ, ह.भ.प. अंगद महाराज ढोले, ह.भ.प. दीपक महाराज गांगर्डे आणि ह.भ.प. राजाभाऊ महाराज म्हेत्रे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

 

वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा, संत साहित्य, अध्यात्मिक ज्ञान, भक्तिभाव आणि जीवनमूल्यांचे शिक्षण नव्या पिढीला मिळावे, या उद्देशाने सुरू झालेल्या या संस्थेच्या भूमिपूजनामुळे जामखेडमध्ये वारकरी शिक्षणाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. केवळ शैक्षणिक ज्ञान नव्हे, तर जीवनाला योग्य दिशा देणारे संस्कार घडविण्याच्या या उपक्रमाचे जामखेडकरांकडून स्वागत होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!