सौताडा घाटात मानवी हात सापडल्याने खळबळ! कोपरापासून तुटलेला हात कोणाचा? जामखेड-पाटोदा परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण!
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड आणि बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या सौताडा घाट परिसरात कोपरापासून तुटलेला मानवी हात आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेमुळे जामखेडसह पाटोदा परिसरात भीती आणि आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दि. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या दरम्यान सौताडा घाट परिसरात हा मानवी हात आढळून आला. कोपरापासून वेगळा झालेला मानवी हात दिसून आल्यानंतर ही बाब समोर आली. घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली.
सौताडा घाट हा जामखेड आणि पाटोदा तालुक्यांच्या सीमेवरील परिसर असल्याने या घटनेने दोन्ही भागांत खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्क लढविले जात असले, तरी अधिकृत तपासातूनच या घटनेचे नेमके वास्तव स्पष्ट होणार आहे.
मानवी हात कोणाचा? तो सौताडा घाटात कसा पोहोचला? या प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासातूनच समोर येणार असून, या घटनेच्या पुढील तपासाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.