ड्रग्जचे मोठ्या शहरातील लोन आता ग्रामीण भागापर्यंत पोहचल्याचे पहायला मिळत आहे. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारे रॅकेट जामखेड तालूक्यात सक्रिय असल्याचा पर्दाफाश झाला आहे. सखोल चौकशी केली तर आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
जामखेड शहराजवळील जामखेड कर्जत रोडवर एका फर्निचरच्या दुकानासमोर मोटारसायकल वरुन विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना एक जणाकडुन 6.17 मिली ग्रॅम वजनाचे सव्वा लाख रुपये कीमतीचे मॅफेड्रॉन ड्रग्ज स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जामखेड पोलीसांच्या मदतीने जप्त केले आहे.
या प्रकरणी दोन जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी आरोपी मंगेश हिरामन पवार, वय 30 वर्षे रा. कान्होपात्रा नगर, जामखेड व मकसुद बागवान (पुर्ण नाव माहित नाही) रा. करमाळा जिल्हा. सोलापुर आशा दोन जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोठ्या शहरातील ड्रग्ज चे लोन आता ग्रामिण भागापर्यंत पोहचल्याचे वरील घटनेवरून पहायला मिळत आहे. कारण जामखेड सारख्या ग्रामिण भागात ड्रग्ज विक्री होत असल्याचे या घटनेवरून समोर येत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहिती नुसार शनिवार दि 14 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी आरोपी मंगेश हिरामन पवार वय 30 वर्षे रा. कान्होपात्रा नगर, जामखेड हा जामखेड शहराजवळील जामखेड कर्जत रोडवरील एका फर्निचरच्या दुकानासमोरुन पाठीमागे नंबर प्लेट नसलेल्या व समोरच्या बाजूला मोटारसायकल क्र. एम. एच 16, डी. ई 1713 असा क्रमांक आसलेल्या मोटारसायकल वरुन चालला होता.
यावेळी पोलिसांनी त्यास आडवुन त्याची तपासणी केली असता त्याच्या जवळ 6.17 मिली ग्रॅम वजनाचे 1 लाख 23 हजार 400 रुपये किमतीचा एका पांढर्या रंगाच्या छोट्या प्लास्टिक पाऊच मध्ये असलेला मॅफेड्रॉन नावाचा अमली पदार्थ आढळून आला. याची आंतरराष्ट्रीय बाजारात 20 हजार रुपये प्रति ग्रॅम प्रमाणे किंमत आहे. सदर आरोपीकडुन 1 लाख रुपये कीमतीची मोटारसायकल व 1 लाख 23 हजार 400 रु किमतीचे ड्रग्ज असा एकुण 2 लाख 23 हजार 400 रुपये कीमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पो. हे.कॉ. र्हदय गौतम घोडके यांनी दिलेल्या फिर्यादी वरून वरील दोन जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी व जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग राहुल द्वारके, गणेश लबडे, संतोष खैरे, पोलीस नाईक शामसुंदर जाधव, भीमराज खडसे, पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सुनील मालकर, चालक अरुण मोरे, महादेव मिसाळ यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे करित आहेत.