दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पाळीच्या सनराईज् शैक्षणिक संस्थेचा पुढाकार! सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडे ३१ हजारांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पाळीच्या सनराईज् शैक्षणिक संस्थेचा पुढाकार!
सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडे ३१ हजारांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द
दुष्काळाच्या संकटाने होरपळणाऱ्या नागरिकांच्या मदतीसाठी आता शैक्षणिक क्षेत्रातूनही मदतीचे हात पुढे येत आहेत. सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे भान जपत पाडळी येथील सनराईज एज्युकेशन अँड मेडिकल फाउंडेशन संचलित साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय व स्व. एम. ई. भोरे ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ३१ हजार रुपयांचा धनादेश महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, केवळ ज्ञानदानाचे कार्य न करता सामाजिक संकटाच्या काळात समाजाच्या मदतीला धावून जाण्याचा आदर्श या शैक्षणिक संस्थेने निर्माण केला आहे.
संस्थेच्या प्राचार्या श्रीमती अस्मिता जोगदंड (भोरे), श्री. चंद्रकांत सातपुते, श्रीमती सुषमा भोरे, श्री. महेश पाटील, श्री. दिनकर सरगर, श्री. हनुमंत वाघमारे, श्री. बुवासाहेब दहीकर, श्री. विनोद बहिर, श्रीमती स्वाती पवार, श्री. प्रदीप भोंडवे, श्री. दादासाहेब मोहिते, श्री. छबिलाल गावित आणि श्री. सुनील घाडगे यांनी आपल्या एक दिवसाच्या वेतनाचे योगदान देत या मदतनिधीत सहभाग नोंदविला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. संजय भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकजुटीने पुढाकार घेत दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आपले योगदान दिले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शरद भोरे, भाजपचे नेते आजिनाथ हजारे, बावी सोसायटीचे चेअरमन सुंदरदास बिरंगळ, संस्थेचे संचालक तेजस दादा भोरे, दादासाहेब मोहिते, विनोद बहिर, दिनकर सरगर, बाजार समितीचे संचालक डॉ. गणेश जगताप, नगरसेवक संजय काका काशिद, माजी सभापती डॉ भगवानराव मुरुमकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दुष्काळामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि ग्रामीण भागातील कुटुंबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा संकटाच्या काळात प्रत्येकाने आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे, हीच भावना या संस्थेच्या उपक्रमातून व्यक्त झाली आहे.
शिक्षण देतानाच सामाजिक भान जपणारी संस्था, शिक्षकांच्या एका दिवसाच्या वेतनातून उभा राहिलेला ३१ हजारांचा मदतनिधी आणि दुष्काळग्रस्तांसाठी पुढे आलेली माणुसकीची भावना, हा पाडळीच्या शैक्षणिक संस्थेचा उपक्रम निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.