जामखेड न्युज – – –
उन्हाने अंगाची लाहीलाही झाल्यावर आता सोमवार (ता. ०७) आणि मंगळवार (ता. ०८) मार्चला राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिला आहे. त्याचबरोबर गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि आसपासच्या परिसरातील सकाळचे ढगाळ हवामान आजही कायम होते. मागच्या दोन आठवड्यांपासून राज्यात सूर्य आग ओकत असून मार्चच्या सुरुवातीलाच अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांच्या पार गेलाय.
कुठे पडणार पाऊस ?
विकेंडनंतर पुढील दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात (IMD alerts) आली आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार,
सोमवारी 07 मार्च रोजी पालघर जिल्ह्यात ढगाळ हवामानाची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहे. तसेच याचदिवशी नाशिकसह, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या ठिकाणी विजांचा गडगडाट होणार आहे.
त्यामुळे आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अथवा लांबचा प्रवासा टाळावा, असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
मंगळवारी (8 मार्च) राज्यात पावसाची व्याप्ती आणखी वाढणार असून कोकणासह दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे.
ह्या जिल्ह्यांत मध्यम पावसाची शक्यता
मंगळवारी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बीड, परभणी आणि हिंगोली या दहा जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
अहमदनगर मध्ये पाऊस नाही मात्र विजांचा कडकडाट !
तर दरम्यान पुण्यासह अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट होणार आहे.
यासोबत, नैऋत्य बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेला हवेच्या दाबाचं क्षेत्र मागील 06 तासांत 15 किमी प्रतितास वेगानं उत्तर-वायव्य दिशेनं सरकला आहे. त्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे.
याचाच परिणाम म्हणून आज तामिळनाडूचा किनारी प्रदेश, पुड्डुचेरी, कराईकल, दक्षिण आंध्र प्रदेश आणि रायसीमा परिसरात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.





