जामखेड न्युज – – – –
चोपडा (Chopda) तालुक्यातील वाळकी शिवारातील शेतकरी (farmer) प्रकाश सुधाकर पाटील यांच्या मालकीच्या घोडगाव शिवारातील शेतात तब्बल १ हेक्टर ३० आर म्हणजे तीन एकर क्षेत्रात अफूच्या झांडाची लागवड करण्यात आली असल्याची गोपनिय माहिती चोपडा ग्रामीण पोलीस (Chopda Police) स्टेशनचे पोलिस निरिक्षक देविदास कुनगर यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक देविदास कुनगर यांनी प्रभारी नायब तहसिलदार देवेंद्र नेतकर, पोउनि अमरसिंग वसावे, पो.कॉ. सुनिल जाधव, सुनिल कोळी, राजु महाजन, भरत नाईक, शशिकांत पारधी, लक्ष्मण शिंगाने इत्यादी पोलिस कर्मचारी पथकासह घटनास्थळी गेले असता तीन एकर क्षेत्रात अफूच्या झाडाची लागवड करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
अफू लागवड करणाऱ्यांचे धाबे दणादणले
कृषी अधिकारी प्रशांत देसाई यांनाही घटनेची माहिती कळवून बोलविण्यात आले होते. घटनास्थळी पोहचत संबंधित अधिकाऱ्यांचा दिवसभर पंचनामा सुरु होता. या अफूच्या झाडांची प्राथमिक किंमत अंदाजे कोट्यावधीच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस (Police) विभागाच्या या मोठ्या कारवाईमुळे अफू लागवड करणाऱ्यांचे धाबे दणादणले आहे. अशा प्रकारची लागवड या परिसरात अन्य कुठे करण्यात आली आहे का? याचा देखील तपास पेलिस विभागातर्फे करण्यात येत आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिस अधिक्षकांची भेट
घटनास्थळी जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी भेट दिली असून त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, सदर अफूची शेती साधारणतः तीन एकरवर दिसून येत आहे ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास कूनगर यांना सदर अफूच्या शेतीच्या संदर्भातील माहिती मिळाली होती. त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे. शेतकरी प्रकाश पाटील याने प्रतिबंधित अफूची शेतीची लागवड केली असून त्यामुळे सदर शेतकऱ्यावर उचित प्रकारे योग्य ती कारवाई केली जाईल आणि सदर कारवाई करणे सुरू झाले असून लवकरात लवकर अजून इतरत्र कुठे अफूची लागवड आहे का? याचा शोध घेण्यात येईल. आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात अफूची शेती कोणी केले असल्याचे निदर्शनास आलेले नाही.