चक्क भाजप नगरसेवकाने लावले अजितदादांच्या अभिनंदनाचे होर्डिंग्ज

0
266
जामखेड न्युज – – – 
पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) सत्ताधारी भाजपचे (BJP) नगरसेवक तुषार कामठे (Tusahr Kamthe) यांनी महापालिकेसमोरील चौकासह शहरात मोक्याच्या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नेते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अभिनंदनाचे वीस भलेमोठे होर्डिंग्ज लावल्याने शहरभर त्याची चर्चा सुरु आहे.
     पालिकेतील भ्रष्टाचाराविरुद्ध त्यांनी अनेक प्रकरणांत सभागृहात आणि बाहेरही आवाज उठविलेला आहे. अशाच एका ५५ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची दखल पालिकेतील सत्ताधारी व प्रशासनानेही न घेतल्याने त्यांनी जितदादांकडे तक्रार केली होती. त्याची त्यांनी दखल, तर घेतलीच. शिवाय त्यात पोलिसांनी गुन्हाही दाखल केल्याने कामठे यांनी दादांचे जाहीर अभिनंदन त्यांचे फ्लेक्स लावून केले आहे.
काम केल्याचा बनावट अनुभवाचा दाखला आणि सात कोटी रुपयांची बोगस बॅंक गॅंरटी पिंपरी पालिकेला सादर करून या ठेकेदाराने ५५ कोटी रुपयांचे कंत्राट मिळवले होते. पालिकेच्या आरोग्य विभागाचे गटार व रस्ते सफाईचा हा ठेका कसा मिळवला हे कामठे यांनी कागदपत्रासहित गेल्या डिसेंबर महिन्याच्या पालिका सभेत मांडला. त्यावर कारवाईची मागणी केली. मात्र, ती न झाल्याने त्यांनी त्यासाठी अजितदादांना पत्र देत विनंती केली होती. त्यावर पालिका आयुक्त व पोलिस आयुक्तांना कारवाईचा आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिला होता. त्यानंतर पोलिसांनी विराज चंद्रकांत लायगुडे या ठेकेदाराविरुद्ध नुकताच (ता.११ फेब्रुवारी) फसवणूक आणि बनावटगिरीचा (चिटिंग अॅन्ड फोर्जरी) गुन्हा दाखल केला. लायगुडेने सिक्युअर आय़टी फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रा. लि. या आपल्या कंपनीव्दारे हे काम घेतले होते. त्याने बॅक गॅंरटीच नाही, तर इंदापूरमधील गटारे व रस्त्यांची साफसफाई केल्याचे इंदापूर नगरपरिषदेचे खोटे प्रमाणपत्रही सादर केले होते.
अजितदादा चुकीच्या कामांना थारा देत नाही, असे आजपर्यंत नुसते ऐकून होतो. त्याचा प्रत्यय आल्याची प्रतिक्रिया कामठे यांनी त्यांनी उघडकीस आणलेल्या प्रकरणात अजितदादांच्या मध्यस्थीनंतर गुन्हा दाखल झाल्यावर दिली होती. इतर घोटाळ्यांबाबत मी पाच वर्षे भांडत होतो. स्थानिक भाजप आमदारांनीही न्याय दिला नाही. पण, अजितदादांनी तो दिला. मदत केली. म्हणून त्यांचे कौतूक केलेच पाहिजे, या भावनेतून त्यांच्या अभिनंदनाची होर्डिंग्ज शहरभर लावल्याचे त्यांनी सांगितले.
“दादा, तुमचे खूप आभार. आपण दाखवून दिले जे चुकीचे आहे, ते चुकीचेच आहे. भ्रष्टाचार नष्ट झालाच पाहिजे, मग भ्रष्टाचारी कोणी का असेना. तुम्ही घेतलेल्या निर्णयामुळे घोटाळेबाज कंत्राटदार व त्याच्या कंपनीवर गुन्हा, तर दाखल झालाच. शिवाय, करदात्यांचे ५५ कोटी रुपयेही वाचविलेत“, असा मजकूर या फ्लेक्सवर आहे. हे फ्लेक्स मोक्याच्या जागी असल्याने येणाऱ्या, जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे त्याची एकच चर्चा शहरात सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here