जामखेड न्युज – – –
बीड जिल्ह्यातील नागरिकांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न असलेला अहमदनगर- परळी रेल्वेमार्ग अंतिम टप्प्यात आला आहे. अहमदनगर- आष्टी (जि. बीड) या ६७ किलोमीटर अंतरात शुक्रवारी (ता. ४) रेल्वे धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतून ऑनलाइन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून या रेल्वेचा प्रारंभ करणार आहेत.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे अहमदनगर-परळी (जि. बीड) हा रेल्वेमार्ग अस्तित्वात आला. मुंडे यांनी या मार्गासाठी मोठे योगदान दिले. अहमदनगर ते परळी हे सुमारे २६१ किलोमीटर अंतर आहे. दोन हजार ८२६ कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. यापैकी निम्मा खर्च राज्य सरकारला करावा लागणार आहे.राज्य सरकार काम सुरू झाल्यापासून निम्मा खर्च देत आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षी एक हजार ५५७ कोटी ९२ लाख रुपये खर्च केला. २०२१- २२ या आर्थिक वर्षामध्ये २४९ कोटी ८८ लाखांची तरतूद केली.





